Assam Crime News: शिक्षकाने वारंवार केलेल्या लैंगिक छळाला कंटाळून आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील एका १४ वर्षांच्या विद्यार्थिनीने ६ जुलै रोजी आत्महत्या केली. या मृत पीडितेने जूनमध्येही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान पोलिसांना चार पानांची एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये मृत विद्यार्थीनीने तिच्या शिक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. या चिठ्ठीत तिने आरोप केला आहे की, इतर तीन शिक्षकांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.

या प्रकरणामुळे आसाममध्ये संतापाची लाट उसळली आहे. या मृत विद्यार्थीनीने शिक्षकाच्या छळाला कंटाळून जूनमध्ये पहिल्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर तिच्या कुटुंबाने दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) असे म्हटले आहे की, नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मे महिन्यात पहिल्यांदा शिक्षक विकू छेत्री याने तिचा छळ केला होता.

२६ मे रोजी छेत्रीने सॉफ्ट ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि वर्ग संपल्यानंतर शाळेच्या स्वयंपाकघरात विद्यार्थिनीला दिल्याचा आरोप आहे. तोपर्यंत इतर विद्यार्थी निघून गेले होते, असे सूत्रांनी सांगितले.

३ जून रोजी मुलीने पहिल्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले होते, त्यावेळी डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर करून तिला वाचवण्यात यश मिळवले होते. त्यानंतर मुलीच्या कुटुंबाने मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित कठोर पॉक्सो कायद्याअंतर्गत ढोला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर ११ जून रोजी शिक्षक छेत्रीला अटक करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण, ६ जुलै रोजी पीडित मुलीने दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला आणि यामध्ये तिचा मृत्यू झाला. यावेळी मात्र, तिला डॉक्टर वाचवू शकले नाहीत. पीडित मुलीच्या भावाने रविवारी शिक्षकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल दुसरा एफआयआर दाखल केला आहे. अनेक सामाजिक संघटनांनी शिक्षकाविरुद्ध कठोर शिक्षेची मागणी केली आहे.