केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा विधेयकाची (सीएए) अधिसूचना सोमवारी (११ मार्च) प्रसिद्ध केली. केंद्र सरकारने ‘सीएए’बाबतची अधिकृत घोषणा केल्यानंतर पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांक नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा झाला. यामध्ये हिंदू, जैन, शीख, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन या धर्मातील अल्पसंख्यांकांना भारताचे नागरिकत्व देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाला विरोधकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारने ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी हा निर्णय घेतल्यामुळे भाजपा मतदानासाठी हे करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
या सर्व विषयांवर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन नागरिकत्व सुधारणा विधेयकाला जोरदार विरोध केला. “भाजपा या ‘सीएए’च्या अंमलबजावणीत मताचे राजकारण करत असून आपल्या हक्काच्या घरात पाकिस्तानी लोकांना बसवण्याचे काम करत आहे. देशात सुमारे दोन ते तीन कोटी लोक येतील”, असा अंदाज अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.
अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
“केंद्र सरकार नागरिकत्व सुधारणा विधेयकाची अंमलबजावणी करून आपल्या हक्काच्या घरात पाकिस्तानी लोकांना बसविण्याचे काम करत आहे. सरकारी पैसा हा देशाच्या विकासासाठी खर्च व्हायला पाहिजे. मात्र, तो पैसा आता पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील लोकांना भारतात स्थायिक करण्यासाठी खर्च केला जाणार आहे. या तीन देशात जवळपास तीन कोटी लोक अल्पसंख्यांक आहेत. आता या अल्पसंख्यांकांसाठी भारताचे दरवाजे उघडतील, तसे या देशातून मोठ्या प्रमाणात लोक भारतात येतील. तीन कोटीमधून दीड कोटी लोकं जरी भारतात आले तरी त्यांना रोजगार कोण देणार? या लोकांना कोठे बसविणार? भाजपाचे नेते त्यांच्या घरी ठेवणार आहेत का? भाजपाचे नेते त्यांना रोजगार देणार का?,” असे अनेक प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केले.
हेही वाचा : “राहुल गांधी वीर सावरकरांच्या भूमीत येत आहेत, आम्ही…”; संजय राऊत यांचं महत्त्वाचं वक्तव्य
अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले, “देशातील मध्यमवर्ग महागाईने होरपळत आहेत. तरुणांना रोजगार मिळत नाही. मग हे प्रश्न सोडविण्याऐवजी केंद्र सरकारने ‘सीएए’ आणला आहे. यामुळे केंद्र सरकार पैसा पाकिस्तानी लोकांवर खर्च होणार आहे. देशात जवळपास दीड-दोन कोटी लोक येतील. पण भाजपा हे सर्व मतांचे राजकारण करत असून भाजपा हा एकमेव पक्ष आहे, मतासांठी घाणेरडे राजकारण करत आहे. मात्र, आसामसह ईशान्य भारतातील लोकांचा या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध असून जनतेचा विश्वासघात झाला आहे. जनता भाजपाला निवडणुकीत मतदान करून प्रत्युत्तर देईल”, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
“‘सीएए’मुळे भारतात दरोडे, बलात्कार वाढतील…”
“देशात जो ‘सीएए’ कायदा आणला आहे, त्या माध्यमातून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्यांक नागरिकांना भारताचं नागरिकत्व दिलं जाईल. या तीन देशांचे मिळून जवळपास अडीच ते तीन कोटी अल्पसंख्यांक आहेत. त्यांच्यासाठी आपल्या देशाने असे दरवाजे उघडले तर मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक इकडे येतील. आपल्या घराच्या शेजारी पाकिस्तानी लोकं येऊन बसले तर तुम्ही पसंत करणार का? आपल्याला माहिती नाही ते लोक कोण आहेत? त्यामुळे सर्व कायदा सुव्यस्था बिघडून जाईल, चोरी, दरोडे, बलात्कार वाढतील. दंगली वाढतील, देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे काय होईल. मग हा कायदा का आणला? पण भाजपा हे सर्व मतांचे राजकारण करत आहे”, असा आरोप केजरीवाल यांनी केला.