CM Devendra Fadnavis On Donald Trump Remark On PM Modi : अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतीय मालावर ५० टक्के टॅरिफ लादल्यानंर अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यापारी संबध तणावाचे बनले आहेत. यादरम्यान नुकतेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. मोदी हे एक ग्रेट पंप्रधान असल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत. दरम्यान ट्रम्प यांनी केलेल्या स्तुतीनंतर महाराष्ट्राचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना ग्रेट असे म्हटल्यानंतर फडणवील म्हणाले की, “यात काय दुमत नाही आणि ट्रम्प असे म्हणाले हे ठीक आहे. त्यांनी म्हटलं नसतं तरीही मोदी ग्रेटच होते. जगातील पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष त्यांना ग्रेटच मानतात. अमेरिकेची जी वागणूक दिसत आहे, की कोणी कौतुक करतं तर कोणी आपले पाय खेचण्याचा प्रयत्न करतं, मी एवढंच सांगू इच्छितो की, हा नवा भारत आहे. हा मोदींचा भारत आहे. हा भारत आपली परराष्ट्र नीती स्वतः निश्चित करतो, आमची परराष्ट्र नीतीवर दुसरे कोणीही नियंत्रण ठेवू शकत नाही. मोदींच्या नेतृत्वात सक्षम भारत आहे. जो आपल्या बरोबर आहे त्याला सोबत घेऊन जाऊ जो सोबत येणार नाही त्याच्याशिवाय देखील आपण विकसित भारताकडे जाऊ,” असे देवेंद्र फडणवीस एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?
भारत-अमेरिका संबंधांबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना शुक्रवारी प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी सांगितले की, ते नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र राहतील. याचबरोबर भारत-अमेरिकेतील संबंध खास असल्याचेही म्हटले. यावेळी त्यांनी असेही म्हटले की दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये काळजी करण्यासारखे काहीही नाही. पण, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या सध्याच्या काही धोरणांशीही असहमती व्यक्त केली आहे.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “मी नेहमीच पंतप्रधान मोदींचा मित्र राहीन. ते एक महान पंतप्रधान आहेत. पण सध्या मला त्यांची काही धोरणे आवडत नाहीत. भारत आणि अमेरिकेचे संबंध खूप खास असले तरी काळजी करण्यासारखे काही नाही. कधीकधी असे क्षण येतात.”
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी काल सोशल मीडियावर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो शेअर केला होता. यावेळे त्या फोटोला ट्रम्प यांनी, “असे दिसते की आपण भारत आणि रशियाला चीनसमोर गमावले आहे. त्यांचे एकत्र भविष्य दीर्घ आणि समृद्ध असो!”, असे कॅप्शन दिले होते.
ट्रम्प यांनी त्यांच्या या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. यावर ते म्हणाले, “मला वाटत नाही की असे काही घडले आहे. हो, भारत रशियाकडून इतके तेल खरेदी करत आहे याबद्दल मी निश्चितच निराश आहे. मी त्यांना हे स्पष्ट केले आहे. आम्ही भारतावर ५० टक्क्यांचा खूप मोठा टॅरिफ लादले आहे. पण तुम्हाला माहिती आहेच, माझे मोदींशी चांगले संबंध आहेत. ते काही महिन्यांपूर्वी येथे आले होते, आम्ही रोज गार्डनमध्ये एक संयुक्त पत्रकार परिषद देखील घेतली होती.”