पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे सपत्नीक आगमन. त्यानंतर सोनिया गांधी व राहुल यांची स्नेहपूर्वक भेट. वधू-वरांना आशीर्वाद दिल्यानंतर ‘पण वधूमाय कुठे आह़े़,’ अशी सोनिया गांधींची विचारणा. लागलीच वधूपक्षाची धावाधाव. सोनिया-राहुल यांनी यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी, छायाचित्र काढण्यासाठी अनेकांची लगबग. या गर्दीतून वाट काढत सौ. सत्त्वशीला चव्हाण सोनियांच्या समोर येतात. उभयतांमध्ये कौटुंबिक विचारपूस होते आणि हा क्षण अनेकांच्या कॅमेऱ्यात टिपला जातो. राजकारणापलीकडचा हा ऋणानुबंध दृढ झाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कन्या अंकिता व प्रखर भंडारी यांच्या विवाह सोहळ्यात.
भपकेबाजपणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ल्युटन्स झोनमध्ये ११ रेस कोर्सच्या हिरवळीवर मुख्यमंत्र्यांच्या कन्येचा विवाह सोहळा साधेपणाने पण दिमाखात पार पडला. पंतप्रधानांच्या कार्यालयात असताना पृथ्वीराज चव्हाण यांचे खास समजले जाणारे दिल्लीकर पत्रकार, राजकारणी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या सोहळ्यास हजेरी लावली. दिग्विजय सिंह यांच्याभोवती पत्रकारांचे कोंडाळे. त्यांना दिलखुलासपणे दिग्गीराजा बातम्या देत होते. सतत मोदींवर तर अधूनमधून शिवराजसिंह चौहान यांच्यावर बरसत होते. तेवढय़ात एकच गलका झाला, ‘अहमदभाई आलेत’. दिग्गीराजा सावध. सभोवतालच्या कोंडाळ्यातून दिग्गीराजा कटाक्ष टाकून अहमदभाईंच्या हालचाली, त्यांना भेटायला येणारी माणसे टिपण्याचा प्रयत्न करतात. तिकडे अहमदभाई शांत. कुणी काही बोलले तर फक्त स्मितहास्य करतात.
या विवाह सोहळ्यास उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,  खासदार हुसैन दलवाई, एकनाथ गायकवाड, भवरलाल जैन, भालचंद्र मुणगेकर यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते. भाजपचे लालकृष्ण अडवाणी, भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद, यांनीदेखील हजेरी लावली. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तर रांगेत थांबून नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.