scorecardresearch

कोळसा घोटाळा : रुंगठा बंधूंना चार वर्षांची शिक्षा

झारखंड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला २५ लाख रुपयांचा दंड

coal scam, कोळसा घोटाळा
खटल्याच्या सुनावणीवेळी सर्व आरोपींनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते. आपण निर्दोष असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांकडून न्यायालयात करण्यात आला होता.

कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी विशेष न्यायालयाने सोमवारी झारखंड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे दोन संचालक आर. एस रुंगठा आणि आर. सी. रुंगठा यांना चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. गेल्याच आठवड्यात न्यायालयाने या दोन्ही भावांसह झारखंड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दोषी ठरवले होते. कोळसा घोटाळ्यामध्ये झालेली ही देशातील पहिलीच शिक्षा आहे. न्यायालयाने झारखंड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला २५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
या प्रकरणात दोन्ही भावांविरुद्ध फसवणुकीचे आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. या दोन्ही आरोपांखाली कंपनीसह या दोघांना दोषी ठरविण्यात आले आहे. दोन्हीही रुंगठा बंधू जामीनावर बाहेर होते. पण न्यायालयाने त्यांना दोषी ठरविल्यावर पोलिसांनी त्यांना लगेचच ताब्यात घेतले. केंद्रीय अन्वेषण विभागाचे विशेष न्यायाधीश भारत पराशर यांनी हा निकाल दिला.
खटल्याच्या सुनावणीवेळी सर्व आरोपींनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते. आपण निर्दोष असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांकडून न्यायालयात करण्यात आला होता. या प्रकरणात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना बचाव पक्षाचे साक्षीदार म्हणून न्यायालयात बोलवावे, अशी मागणी रुंगठा यांच्या वकिलांकडून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये करण्यात आली होती. पण न्यायालयाने ती फेटाळली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-04-2016 at 17:21 IST

संबंधित बातम्या