Air India News Cockroaches in Flight : एअर इंडिया कंपनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. विमान अपघात, विमानातील तांत्रिक बिघाडांमुळे अचानक रद्द केलेली उड्डाणे, अथवा अचानक उतरवण्यात आलेली विमानं, सुरक्षिततेच्या कारणास्वत वळवण्यात आलेली विमानं आणि विमानातील इतर समस्यांमुळे कंपनीची प्रतिमा दिवसेंदिवस खराब होत आहे. आता या कंपनीच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये झुरळं सापडली आहेत. एअर इंडियाच्या एआय-१८० विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना झुरळांमुळे मनःस्ताप सहन करावा लागला आहे.

सॅन फ्रान्सिस्कोवरून कोलकाता मार्गे मुंबईला जाणाऱ्या विमानात दोन प्रवाशांना झुरळांमुळे त्यांची सीट (आसन) बदलावी लागली आहे. दरम्यान, विमानाचा कोलकात्यामध्ये थांबा होता. त्यामुळे हे विमान कोलकात्यामध्ये उतरवण्यात आल्यानंतर ते स्वच्छ करण्यात आलं. त्यानंतर प्रवाशांनी कुठल्याही त्रासाशिवाय कोलकात्यावरून मुंबईपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. एआय-१८० हे विमान अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोवरून मुंबईसाठी रवाना झालं होतं. मात्र, या विमानातील प्रवाशांना झुरळांमुळे प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला.

विमानाने सॅन फ्रान्सिस्कोवरून उड्डाण केल्यानंतर काही वेळाने दोन प्रवाशांनी त्यांच्या सीटखाली काही झुरळं असल्याचं पाहिलं. झुरळं पायाजवळ फिरत असल्याचं पाहून त्यांनी विमानातील क्रू सदस्यांकडे तक्रार केली. त्यानंतर दोन प्रवाशांची सीट बदलण्यात आली. त्यानंतर विमान कोलकाता विमानतळावर उतरवल्यानंतर विमानाची साफसफाई करण्यात आली. दरम्यान, विमान कंपनीने प्रवाशांना आश्वासन दिलं आहे की या प्रकरणाचा तपास केला जाईल. स्वच्छतेत त्रुटी होत्या की कुठल्या कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला याबाबतचा तपास केला जाईल.

विमान कंपनीने मागितली माफी

एअर इंडियाचे प्रवक्ते या घटनेबाबत म्हणाले, “सॅन फ्रान्सिस्कोवरून कोलकातामार्गे मुंबईला जाणारी फ्लाइट एआय-१८० मधील दोन प्रवाशांना काही छोट्या झुरळांमुळे मनःस्ताप सहन करावा लागला. घटनेचं गांभीर्य पाहून आमच्या क्रू सदस्यांनी दोन्ही प्रवाशांना त्याच केबिनमध्ये तातडीने दुसरी सीट उपलब्ध करून दिली. दुसऱ्या सीटवर बसून त्यांनी आरामात उर्वरित प्रवास केला. कोलकाता विमानतळावर विमान उतरवल्यानंतर विमानात इंधन भरेपर्यंत आमच्या सफाई कर्मचाऱ्यांनी ताबडतोब विमान स्वच्छ केलं. त्यानंतर विमान कोलकात्यावरून मुंबईसाठी रवाना झालं.

एअर इंडियाने म्हटलं आहे की आम्ही नियमितपणे आमची विमानं स्वच्छ करतो. तरीदेखील ग्राउंड ऑपरेशन्सदरम्यान काही वेळा लहान किटक विमानात घुसतात. आम्ही सदर घटनेचं कारण शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रकरणाचा व्यापक तपास केला जाईल आणि त्यावर उपाय शोधला जाईल. जेणेकरून यापुढे अशी घटना घडू नये. यासाठी प्रत्येक आवश्यक उपाय केले जातील. दरम्यान, आमच्या प्रवाशांना झालेल्या असुविधेसाठी आम्ही त्यांची क्षमा मागतो.