पीटीआय, चेन्नई
मध्य प्रदेशातील २२ मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ‘कोल्ड्रिफ’ या खोकल्यावरील औषधाचे उत्पादन करणाऱ्या ‘श्रेसन फार्मास्युटिकल्स’ कंपनीचा औषध निर्मितीचा परवाना तमिळनाडू सरकारने रद्द केला आहे. तसेच कंपनीचे कारखाने पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे तपासण्यासाठी सक्तवसुली संचालनालयही (ईडी) सक्रिय झाले असून कंपनीशी संबंधित सात ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
तमिळनाडूतील अन्न औषध प्रशासनाच्या पथकाच्या तपासणीत या औषधात ‘डिथायलीन ग्लायको’ या विषारी घटकाचे प्रमाण ४८.६ टक्के असल्याचे समोर आले होते. त्याचप्रमाणे निर्मिती प्रक्रिया आणि प्रयोगशाळेतील सदोष पद्धतींसह जवळपास ३०० महत्त्वाच्या नियमांचे उल्लंघन कंपनीने केल्याचे समोर आले होते. कांचीपूरमस्थित या कंपनीने औषध निर्मितीसाठी २०११ मध्ये हा परवाना घेतला होता. मात्र १५ वर्षांत एकदाही या कंपनीची तपासणी झालेली नसल्याचे केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण मंडळाने स्पष्ट केले आहे.
याप्रकरणी कंपनीचा मालक जी. रंगनाथन याला मध्य प्रदेशातील पोलिसांच्या विशेष तपास पथकाने यापूर्वीच अटक केली आहे. तसेच मध्य प्रदेशातील दोन औषध निरीक्षक आणि अन्न औषध प्रशासनाच्या एका संचालकालाही निलंबित करण्यात आले आहे. तमिळनाडू सरकारनेही यापूर्वी दोन वरिष्ठ औषध निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
सात ठिकाणी कारवाई
याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कंपनीसह अधिकाऱ्यांच्या निवासस्थान व कार्यालयांवर छापे टाकले आहेत. यामध्ये कंपनीचे प्रमुख अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे संचालक पी. यू. कार्तिकेयन यांच्याशी संबंधित ठिकाणांचाही समावेश आहे. कार्तिकेयन यांना जुलैमध्ये लाचप्रकरणी अटकही करण्यात आली होती. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार औषध विक्रीतून झालेला नफा हा गुन्ह्यातून मिळालेला असून त्याबाबत पुरावे गोळा करण्यात येत असल्याचे ‘ईडी’ने सांगितले.