पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगाणा जिल्ह्यातील बरासतमध्ये शुक्रवारी एका २० वर्षीय महाविद्यालयीन तरूणीचा मृतदेह एका तळ्यात सापडला. या तरूणीवर सामूहिक बलात्कार करून तीचा खून करण्यात आला असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी रस्ता रोको करत काही तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांना धक्काबुक्की केली.
ही तरूणी शिकवणीवरून घरी येत असताना तरूणांच्या एका टोळक्याने तीला घटनास्थळी ओढत नेले व तिच्यावर बलात्कार केला. त्या तरूणीच्या घराजवळील तळ्यामध्ये रात्री १० वाजता तीचा मृतदेह सापडल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारयांनी सांगितले.
मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून त्या भागात राहणारे तरूणांचे एक टोळके नेहमी तिची रस्त्यात छेड काढत होते. “सामुहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, तीन व्यक्तींना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.”, असे बरासत पोलिस स्थानकाच्या वरिष्ठ पोलिस अधिकारयांनी सांगितले.
दरम्यान त्या भागातील संसद सदस्य हाजी नुरूल इस्लाम घटनास्थळी गेले असता प्रक्षुब्ध जमावाने त्यांच्या वाहनाला आग लावली. घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेलेल्या पोलिसांची पाच वाहने जमावाने पेटवून दिली.