Russian President Putin to US: अमेरिकेने लादलेल्या आयातशुल्कामुळे भारतातील निर्यातीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियाकडून कच्चे तेल आयात केल्यामुळे अमेरिकेने भारताला दंडात्मक कर लावला आहे. यावरून आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकाला इशारा दिला आहे. भारत आणि चीन सारख्या देशांवर आर्थिक दबाव टाकला जाऊ शकत नाही. अशाप्रकारच्या दबावामुळे या राष्ट्रातील नेतृत्व कमकुवत होऊ शकते, असेही पुतिन म्हणाले.

शांघाय सहकार संघटनेच्या (SCO) परिषदेत सहभागी झाल्यानंतर पुतिन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, वसाहतवादाचे युग आता संपले आहे. त्यामुळे त्यांनी (अमेरिका) आता लक्षात घ्यावे की, आपल्या भागीदार राष्ट्रांशी या स्वरात बोलता येणार नाही.

तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आरोप केला की, अमेरिका आयातशुल्क आणि व्यापारी निर्बंधाचा वापर जगातील मोठ्या देशांना नमविण्यासाठी करत आहे. “इतिहासात अनेक समस्यांचा सामना करत या देशांतील विद्यमान नेतृत्व उभे राहिलेले आहे. या नेतृत्वाला कमकुवत करणे अयोग्य ठरेल”, असे पुतिन म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, भारतासारख्या देशात १५० कोटींची लोकसंख्या आहे. दुसऱ्या बाजूला चीनसारखा चांगली अर्थव्यवस्था असलेला देश आहे. या दोन्ही देशांचे स्वतःचे कायदे आणि राजकीय व्यवस्था आहे.

राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की, भारत आणि चीनसारख्या देशांना दंड आकारण्याबद्दल धमकावले जात आहे. अशावेळी या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना कमजोर होऊन चालणार नाही. यामुळे त्यांची राजकीय कारकिर्दही धोक्यात येऊ शकते.

अमेरिकेला इशारा देत असताना पुतिन म्हणाले की, कालांतराने हा तणाव कमी होईल. शेवटी सर्व प्रश्न सुटणारच आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्या जागी येईल आणि त्यावेळी आपण राजकीय संवाद पुन्हा सुरू करू शकतो.