Comedian Gaurav Gupta roast Pakistani fan viral Video : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या भीषण हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला. यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कारवाई करत अनेक पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट भारतात ब्लॉक केले होते. यादरम्यान कॉमेडियन गौरव गुप्ता याटा युएस-कॅनडा टूरदरम्यानच्या एका शोमधील पाकिस्तानी प्रेक्षकाबरोबरील झालेल्या संवादाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमूीवर प्रसिद्ध कॉमेडियन गौरव गुप्ताने या फॅनला लाइव्ह शोमध्ये चक्क हनुमान चालीसा म्हणायला सांगितल्याचे पाहायला मिळाले. गौरवने या पाकिस्तानी चाहत्याबरोबर झालेले मजेशीर संभाषण आणि त्याने केलेल्या विनोदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
गौरवने ३० मे रोजी अटलांटायेथील एका कार्यक्रमाने त्याच्या अमेरिका-कॅनडा दौऱ्याची सुरूवात केली आहे. त्यानंतर शिकागोमध्ये दुसरा शो झाला. रविवारी गौरव गुप्ताने त्याच्या एका शोमधील त्याच्या क्राउडवर्क कॉमेडीची एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये एका पाकिस्तानी प्रेक्षकाबरोबर तो संवाद साधताना दिसत आहे.
नेमकं काय झालं?
गौरव गुप्ता याला जेव्हा कळते की त्याच्या प्रेक्षकांमध्ये एक पाकिस्तानी चाहता देखील आहे तेव्हा तो आश्चर्यचकित होतो. यादरम्यान काही प्रेक्षक सिंदूर, सिंदूर असे ओरडायला लागतात. त्यांना शांत केल्यानंतर गौरव सर्वांना नम्रतेने वागण्यास सांगतो. गौरव त्या पाकिस्तानी चाहत्याला म्हणतो की, “भावा, या शोसाठी आलास तुझ्या खूप हिंमत आहे. त्याला वाटलं की कलाकारांना बंदी आहे, पण प्रेक्षकांना तर अजूनही परवानगी आहे.” पुढे गौरव हसत गमतीने म्हणतो की, “चलो, तुम हनुमान चालीसा पढ़ो अब.” यावर सभागृहातील लोक मोठ्याने हसत टाळ्या वाजवू लागतात.
यानंतर गौरव त्या पाकिस्तानी व्यक्तीला त्याचे नाव विचारतो आणि त्याला पाकिस्तानी असल्याने तुला विनोद समजत आहेत का? अशी विचारणा करतो. जेव्हा तो चाहता उत्तर देतो तेव्हा पुन्हा गौरव त्याची खिल्ली उडवतो. गौरव त्या पाकिस्तानी व्यक्तीला विचारतो की तुला सगळं समजतंय का? त्यावर तो हो असं उत्तर देतो. यावर गौरव म्हणतो, “तो तुम्हें समझ नहीं आता, नहीं मिलेगा तुम्हें? इतने सालों से कह रहे हैं कि नहीं मिलेगा,नहीं मिलेगा, फिर आ जाते हो तुम. (मग तुम्हाला समजत नाही का? तुम्हाला मिळणार नाही. इतक्या वर्षांपासून सांगतोय की नाही मिळणार, नाही मिळणार, तरी तुम्ही फिरून येतच राहता).” असं म्हणत गौरवने काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानी लोकांची खिल्ली उडवली. यानंतर लोकांचा एकच कल्लोळ ऐकायला मिळतो.
सोशल मीडियावर या व्हिडीओला लोकांचे तुफान प्रेम मिळत आहे. या व्हिडीओवर लोक भरभरून कमेंट आणि लाइक्स करत आहेत. या व्हिडीओमध्ये कोणतेही अपमानास्पद विधान न करता देखील गौरव गुप्ताने पाकिस्तानी चाहत्याची टर उडवली. दरम्यान काही जणांन याबद्दल खेद व्यक्त केला आहे.