प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचे गुरूग्राम, हरियाणातील शो रद्द करण्यात आले आहेत. १७ आणि १८ सप्टेंबरला कुणाल कामराचे हे शो होणार होते. मात्र, हा शो रद्द करावा, अन्यथा बंद पाडण्यात येईल, अशी धमकी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदने दिली होती. त्यानंतर हा शो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने पोलिसांनी एक निवेदन दिले होते. त्यामध्ये म्हटलं की, कुणाल कामरा हा हिंदू देवी, देवतांचा अपमान करतो. या शोमुळे गुरूग्रामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. हा शो तात्काळ रद्द करण्यात यावा. अन्यथा शो बंद पाडण्यात येईल, असा इशारा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने दिला होता.

गुरूग्रामच्या सेक्टर २९ मधील स्टुडिओ एक्सो बारमध्ये कुणार कामराचे शो होणार होते. १७ आणि १८ सप्टेंबर, असे दोन दिवस हे शो चालणार होते. त्यासाठीची तिकीटे, शो बाबात माहिती आयोजक बारने आपल्या सोशल मिडियावर टाकली होती. त्यानंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बारला भेट देऊन कार्यक्रम रद्द करण्यासाठी विनंती केली होती. त्यात आता बारने शो रद्द केल्याची माहिती दिली आहे. एनडीटीव्हीने याबाबतचे वृत्त दिलं आहे.