Next Chief Justice Of India Justice Suryakant Comments: भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी शपथ घेतल्यानंतर पाच महिन्यांनी ते २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. आता सरकारने त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३ वे सरन्यायधीश म्हणून नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
सध्याच्या सरन्यायाधीशांनंतर सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे नवे सरन्यायधीश होणार आहेत. त्यांच्या नियुक्तीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, न्यायमूर्ती सूर्यकांत २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत आणि जवळजवळ १५ महिने सरन्यायाधीश म्हणून काम करतील. त्यांचा कार्यकाळ ९ फेब्रुवारी २०२७ रोजी संपण्याची अपेक्षा आहे.
गेली अनेक दशके भारताच्या न्यायव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणारे न्यायमूर्ती सूर्यकांत त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी विवध प्रकरणांमध्ये केलेल्या टिप्पण्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अलिकडील काळात विविध प्रकरणांच्या सुनावण्यांदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केलेल्या टिप्पण्यांचा आढावा घेऊया.
आई-वडिलांना लाज वाटेल असे…
रणवीर अलाहाबादियाने समय रैनाच्या “इंडियाज गॉट लेटेंट” या शोमध्ये अश्लील टिप्पणी केल्यामुळे जोरदार वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचले होते. या अश्लील टिप्पणीनंतर विविध राज्यांमध्ये त्याच्याविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. रणवीरने हे सर्व गुन्हे रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
रणवीर अलाहाबादियाच्या खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली होती आणि त्याच्या अश्लील टिप्पणीबद्दल त्याला फटकारले होते. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली होती. त्यावेळी त्यांनी टिप्पणी केली होती की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली, समाजाच्या नियमांविरोधात बोलण्याचा कोणालाही परवाना मिळालेला नाही. ही अश्लीलता नाही तर काय आहे? आई-वडिलांना, बहिणींना लाज वाटेल असे तुमचे शब्द आहेत.”
एखाद्या नागरिकाला त्याचे…
२०२२ मध्ये, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी फॅक्ट-चेकर मोहम्मद झुबैर यांच्या जामीनाच्या सुनावणी वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी ऐतिहासिक भूमिका घेतली होती. त्यांनी म्हटले होते की, “एखाद्या नागरिकाला त्याचे मत व्यक्त करण्यापासून रोखणे असंवैधानिक आहे. सोशल मीडियावर त्याचे मत व्यक्त करण्यापासून रोखणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन ठरेल.”
धार्मिक भावना भडकवल्याबद्दल अनेक राज्यांमध्ये झुबैर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केले होते की, मत व्यक्त करणे हा गुन्हा नाही तर लोकशाहीचे सार आहे.
देशात जे काही घडत आहे त्यासाठी…
२०२२ मध्ये भाजपाच्या तत्कालीन प्रवक्त्या नूपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर देशभरात हा वाद पेटला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कोठोर शब्दांत नूपूर शर्मा यांना फटकारले होते.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी टिप्पणी केली होती की, “देशात जे काही घडत आहे त्यासाठी पूर्णपणे तुम्ही जबाबदार आहे.” त्यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी यावर भर दिला की सार्वजनिक पदावर असलेल्यांनी ते जे काही बोलत आहे ते बोलताना जपून शब्द वापरायला हवे आहेत. कारण एका चुकीच्या विधानामुळे समाजात मोठी फूट पडू शकते. राजस्थानमध्ये नुपूर शर्मा यांच्या विधानाच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या एका टेलरची हत्या झाल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ही टिप्पणी केली होती.
