भारत आत्मनिर्भर बनवण्यासाठी ज्या आत्मविश्वासाची आणि आत्मभानाची गरज होती, त्याचा शुभारंभ राम मंदिराच्या भूमिपूजनातून झाला आहे. देशभर आनंदाचे वातावरण असून शतकानुशतकांचे स्वप्न पूर्ण होत आहे, अशा भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केल्या.
अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे ध्येय ठरवले होते. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस म्हणाले होते, या ध्येयपूर्तीसाठी २०-३० वर्षे काम करावे लागेल. ३० व्या वर्षी ध्येयपूर्तीचा आनंद मिळाला आहे. राम मंदिरासाठी अनेकांनी बलिदान दिले, ते सूक्ष्म रूपाने इथे उपस्थित आहेत. राम मंदिर आंदोलनाचे प्रणेते अशोक सिंघल इथे असते तर किती बरे झाले असते. महंत परमहंस रामदास असायला हवे होते. रथयात्रेचे नेतृत्व करणारे लालकृष्ण अडवाणी घरात बसून हा कार्यक्रम पहात असतील. जे आहेत आणि इथे येऊही शकतात त्यांना बोलावता आले नाही. करोनामुळे परिस्थितीच वेगळी आहे; पण ईश्वराच्या इच्छेनुसार सगळे होते, अशा शब्दांत भागवत यांनी मोदीमय समारंभात अडवाणी आणि सिंघल यांची आठवण काढली.
साऱ्या जगाला आपल्यात आणि आपण साऱ्या जगात बघण्याच्या आध्यात्मिक दृष्टीचा हा शुभारंभ आहे. राम मंदिराची उभारणी म्हणजे देशात एकता आणि जगात नेतृत्वाच्या प्रतीकाची स्थापना आहे. जेवढे शक्य असेल तेवढे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे. जगात संघर्ष सुरू आहे, या काळात भारतच नेतृत्व करू शकेल. भारताकडे जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. करोनामुळे अवघे जग अंतर्मुख झाले आहे. काय चुकले याचा विचार करत आहे. या संकटातून भारत जगाला बाहेर काढू शकेल, असा विश्वास भागवत यांनी व्यक्त केला.
राम सगळ्यांचेच आहेत, राम सगळ्यांमध्ये वसलेले आहेत. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर होईलच. मंदिर उभारण्याची जबाबदारी वेगवेगळ्या व्यक्तींकडे देण्यात आली असून ती पूर्ण केली जाईल. आता आपल्या मनात अयोध्येला सजवायचे आहे. रामाचा धर्म पाळायचा आहे. सगळ्यांचा विकास करणारा, सगळ्यांना आपले मानणारा रामाचा धर्म आहे. आपल्यालाही रामधर्माचे पालन करणारी अयोध्या मनात उभी करायची आहे. आपले हृदय रामाचे श्रद्धास्थान बनले पाहिजे. सर्व प्रकारे दोष नष्ट करून देशवासीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला बरोबर घेऊन जायचे आहे. अशा या मंदिराची स्थापना सक्षम हातांनीच केली आहे, असे सांगत भागवत यांनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
मोदींकडून हनुमान गढीत पूजाअर्चा
अयोध्या, उत्तर प्रदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बुधवारी अयोध्येत आगमन झाल्यानंतर त्यांनी हनुमान गढी मंदिरात जाऊन दर्शन घेत प्रार्थना केली. त्यांच्या समवेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते. पंतप्रधानांनी पारंपरिक धोती कुर्ता परिधान केला होता. मोदी यांना मंदिराच्या धर्मगुरूंनी पगडी दिली. मंदिरात काही काळ घालवल्यानंतर ते श्री रामजन्मभूमी मंदिराकडे रवाना झाले. तेथे त्यांनी भूमिपूजन करण्यापूर्वी भगवान श्री रामलल्ला विराजमान यांचे दर्शन घेतले. पंतप्रधानांनी हनुमान गढीला भेट दिल्याबाबत मंदिराचे महंत राजू दास यांनी सांगितले की, पुराणकथानुसार कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करताना हनुमानाचे आशीर्वाद घेणे गरजेचे असते. हनुमान गढीला ७६ पायऱ्या आहेत. ते उत्तर भारतातील एक प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे.
अनेक वर्षांचे स्वप्न साकार – फडणवीस
मुंबई : अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईसह राज्यभरात गीतरामायण, भजन, आरत्या आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आनंदोत्सव साजरा केला. ‘अनेक पिढय़ांनी वर्षांनुवर्षे पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात आले. या क्षणाचा साक्षीदार होता आले, ही भाग्याची गोष्ट आहे’, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. मुंबईत भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर, पराग आळवणी, खासदार गोपाळ शेट्टी आदी नेत्यांच्या उपस्थितीत भजन, आरत्या, गीतरामायण, मिठाई वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राममंदिरांमध्ये फुलांची विशेष सजावट आणि रोषणाई करण्यात आली होती. बाणगंगा येथे १२५ मंदिरांच्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पूर्वसंध्येलाच दीपोत्सव आणि मुंबई भाजप कार्यालयात गीतरामायण आयोजित करण्यात आले होता.
