पीटीआय, उत्तरकाशी
सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांची सुमारे १७ दिवसांनंतर सुटका झाली आहे. मात्र, त्यांनी घरी परतावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा असल्याने कामासाठी थांबावे की घरी परत जावे असा संभ्रम त्यांच्यापुढे आहे. ‘घरी परत जाण्यासाठी मी रजेचा अर्ज भरला आहे. बांधकाम पुन्हा केव्हा सुरू होईल हे आम्हाला माहीत नाही’, असे बिहारमधील एका मशीन ऑपरेटरने सांगितले.
खोदकामाची नोकरी सोडून द्यावी अशी माझ्या आईची इच्छा असल्याचे दुसऱ्या मजुराने सांगितले. ‘आम्ही अशा परिस्थितीत काम करतो. हे धोकादायक आहे’, असे तो म्हणाला.एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बोगद्याचे सुरक्षा अंकेक्षण पूर्ण झाल्यानंतरच बांधकाम पुन्हा सुरू होऊ शकेल. मजुरांची सुटका करण्यासाठी पर्वताच्या वरील बाजूने सुमारे ४५ मीटपर्यंत खोदकाम करण्यात आले आणि त्याचा ढिगारा अद्याप बोगद्यात पडून आहे, असे तो म्हणाला. ‘आम्हाला येथेच थांबायचे आहे की घरी परत जायचे आहे हे आम्हाला ठाऊक नाही’, असे गेल्या दोन वर्षांपासून सिलक्यारा बोगद्याच्या कामावर असलेल्या ओडिशातील एका मजुराने सांगितले.
मजुरांना घरी जाण्याची परवानगी
सिलक्यारा बोगद्यातून सुटका करण्यात आलेले सर्व ४१ मजूर घरी परतण्यासाठी सक्षम असल्याचे ऋषीकेश येथील अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) गुरुवारी जाहीर केले. या मजुरांची संपूर्ण तपासणी करण्यात आली आणि त्यांची रक्त चाचणी, क्ष-किरण आणि ईसीजी अहवाल सामान्य आहेत, असे डॉ. रविकांत यांनी या मजुरांच्या प्रकृतीबाबत माध्यमांना माहिती देताना सांगितले. ‘हे लोक शारीरिकदृष्टय़ा सामान्य आणि वैद्यकीयदृष्टय़ा स्थिर आहेत. आम्ही त्यांना घरी परत जाण्याची परवानगी दिली आहे’, असे ते म्हणाले. या मजुरांची दीर्घकाळ चाललेल्या मोहिमेनंतर मंगळवारी रात्री बोगद्यातून सुटका करण्यात आली होती.