भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या आधी शौचालये, नंतर मंदिरे या वक्तव्यावर गुरुवारी कॉंग्रेसच्या नेत्यांनी कडाडून टीका केली.
केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी काही महिन्यांपूर्वी असेच वक्तव्य केले होते, त्यावेळी भाजपने त्यांच्यावर कडाडून टीका केली होती. जयराम रमेश यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असे त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी म्हटले होते. आता त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने असे वक्तव्य केल्यानंतर भाजपचे इतर नेते मूग गिळून गप्प का बसले, असा सवाल केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला  यांनी उपस्थित केला.
आधी शौचालये, नंतर देवालये – नरेंद्र मोदी
ते म्हणाले, मोदी हे काही हिंदूत्त्ववादी नेते नाहीत. त्यांनी हिंदूंसाठी काहीही केलेले नाही. मोदी केवळ मते मिळवण्यासाठी स्वतःची हिंदूत्त्ववादी नेता म्हणून प्रसिद्धी करीत आहेत. मते मिळवण्यासाठी ते देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही शुक्ला यांनी केला.
मोदींचे कट्टर विरोधक मानले जाणारे कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनीही त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, शौचालये स्वच्छ करणाऱया व्यक्तीला अध्यात्मिक आनंद मिळतो, असे मोदींनी म्हटले आहे. मोदी यांना स्वतःला असा आनंद मिळाला आहे का, त्यांनी स्वतः कधी शौचालय साफ केले आहे, असा सवाल दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला.