सरसंघचालक मोहन भागवत वयाच्या ७५व्या वर्षी निवृत्त होणार किंवा दुसऱ्याने निवृत्त व्हावे, असे कधीही म्हटले नव्हते या वक्तव्यावर शुक्रवारी काँग्रेसने टीका केली. एक महिन्याच्या काळात भागवत यांनी परस्परविरोधी वक्तव्ये केल्याची टीका काँग्रेसने केली. भागवत यांच्या वक्तव्याचे वृत्त समाजमाध्यमावर प्रसृत करताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक महिना, एक व्यक्ती, दोन परस्परविरोधी वक्तव्ये’, अशी टीका केली.
गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभानिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी प्रश्नांना उत्तर देताना भागवत यांनी आम्ही आयुष्यात कधीही निवृत्त होण्यास तयार आहोत आणि जोपर्यंत संघाची इच्छा असेल तोपर्यंत आम्ही काम करण्यास तयार आहोत, असे म्हटले होते. ७५व्या वर्षाचा संदर्भ कोणत्याही नेत्याच्या निवृत्तीसंदर्भात नव्हता, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले होते.
सरसंघचालकांच्या नेत्यांच्या निवृत्तीबद्दलच्या अलीकडच्या विधानांबद्दलच्या अटकळीला पूर्णविराम मिळाला, ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भात पाहिल्या जात होत्या. मोदी आणि भागवत दोघेही पुढील महिन्यात ७५ वर्षांचे होतील. भागवत यांनी अलीकडेच नागपूरमध्ये दिवंगत आरएसएस नेते मोरोपंत पिंगळे यांचे उदाहरण दिले होते, ज्यामध्ये ७५ व्या वर्षी निवृत्ती किंवा संन्यास घेण्याच्या मुद्द्यावर त्यांची विनोदबुद्धी अधोरेखित केली होती.