नवी दिल्ली : मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना तात्काळ पदमुक्त करण्याची आणि संवेदनशील सुरक्षा परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने घेण्याची मागणी काँग्रेसने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील घृणास्पद अपयश हे अक्षम्य असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

विरोधी पक्षाने असेही म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केलेल्या मणिपूर चौकशी आयोगाने त्याची चौकशी जलद करणे आवश्यक आहे. मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात शनिवारी झालेल्या ताज्या हिंसाचारात किमान पाच लोक मारले गेल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारवर आरोप केले.

हेही वाचा >>> Haryana Elections : आपची २० उमेदवारांची यादी जाहीर, पण काँग्रेसशी सूत जुळेना

‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये खरगे म्हणाले, ‘‘मणिपूरमध्ये पंतप्रधान मोदींचे घोर अपयश अक्षम्य आहे. मणिपूरच्या माजी राज्यपाल अनुसुईया उईके यांनी मणिपूरच्या लोकांचा आवाज ऐकला आहे. त्या म्हणाल्या की, संघर्षग्रस्त राज्यातील लोक अस्वस्थ आणि दु:खी आहेत. कारण त्यांना पंतप्रधान मोदींनी भेट द्यावी अशी त्यांची इच्छा होती. गेल्या १६ महिन्यांत, पंतप्रधान मोदींनी मणिपूरमध्ये एक सेकंदही घालवला नाही. राज्यात हिंसाचार सुरूच आहे आणि जनतेला मोदी-शहा यांच्या संगनमताचे परिणाम भोगावे लागत आहेत.’’

मणिपूरमध्ये आता ड्रोन हल्ले करण्यात येत असून राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोक्याचे आहे. अशा गंभीर परिस्थितीत भाजप दुर्लक्ष करत असल्याचे खरगे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ड्रोन हल्ल्यांविरोधात विद्यार्थ्यांची निदर्शने

मणिपूरमध्ये काही ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी सोमवारी सचिवालय आणि राजभवनासमोर निदर्शने केली. हल्ल्यांमागे कोण आहे याचा शोध घेऊन चौकशी आणि राज्याच्या प्रशासकीय अखंडतेचे संरक्षण करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह आणि राज्यपाल एल. आचार्य यांची भेट घेतली. हिंसाचार नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पोलीस महासंचालक आणि राज्य सरकारच्या सुरक्षा सल्लागार यांना हटवण्यासह सहा मागण्या विद्यार्थ्यांनी या वेळी केल्या.