काँग्रेसची माफीनाम्याची मागणी

१०० कोटींचा पल्ला गाठल्याबद्दल मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली आणि विकसित देशांनाही इतक्या गतीने लसीकरण करता न आल्याचा दावा केला

नवी दिल्ली : करोना लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे अभिनंदन केले असले तरी, ‘‘महोत्सव कशाला साजरा करता, करोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख लोकांच्या कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या,’’ असा पवित्रा शुक्रवारी काँग्रेसने घेतला.

एक अब्ज लसमात्रा दिल्या गेल्या असल्या तरी, देशातील फक्त २१ टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे. केंद्र सरकारने तर वर्षअखेरीस म्हणजे डिसेंबर २०२१ अखेर संपूर्ण लसीकरणाचे आश्वासन दिले होते, मग पुढील दोन महिन्यांमध्ये हे लक्ष्य कसे गाठले जाईल, असा सवाल करत काँग्रेसचे प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत करोनासंदर्भात केंद्राने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी केली. जॉन्सन अँड जॉन्सन, कोर्बेवॅक्स आदी विदेशी लसींना परवानगी का दिलेली नाही? लहान मुलांचे लसीकरण कधीपासून सुरू होणार? अन्य देशांमध्ये तिसरी लसमात्रा म्हणजे बुस्टर डोस दिला जात आहे. त्यासाठी केंद्राने पूर्वतयारी केलेली आहे का, अशा प्रश्नांचा वल्लभ यांनी भडिमार केला.

१०० कोटींचा पल्ला गाठल्याबद्दल मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली आणि विकसित देशांनाही इतक्या गतीने लसीकरण करता न आल्याचा दावा केला. पण जगभरात ५० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले भारत व चीन हे फक्त दोन देश आहेत. भारताने पहिल्यांदा १०० कोटींचे लक्ष्य गाठल्याची माहितीही चुकीची असून चीनने हा टप्पा यापूर्वी पूर्ण केला आहे. चीनमध्ये आत्तापर्यंत २१६ कोटी लसमात्रा दिल्या गेल्या असून तिथे ८० टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे. त्यामुळे मोदींनी अर्धसत्य व चुकीची माहिती देऊ  नये, असा ‘सल्ला’ वल्लभ यांनी दिला. 

लसीकरण शास्त्रीय आधारावर केल्याचा दावा मोदींनी केला असला तरी, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून देशात पहिल्यांदाच लसीकरणाची मोहीम झालेली नाही. १९६२ मध्ये क्षयरोगाविरोधात पहिल्यांदा मोहीम सुरू केली गेली होती. त्यानंतर १९७५ मध्ये २० कलमी कार्यक्रमाअंतर्गत लसीकरण मोहीम आखली गेली. १९८५ मध्ये प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी लसीकरण केले गेले, १९८६ मध्ये कुष्ठरोगाविरोधात लसीकरण सुरू झाले. २०११ मध्ये पहिल्यांदा लसीकरण धोरण आखले गेले. शिवाय, यापूर्वी झालेल्या सर्व लसीकरण मोहिमा मोफतच होत्या. निवडणूक रोख्यांतून मिळणाऱ्या प्रचंड पैशातून भाजपने लसीकरण मोहीम चालवावी, इंधनावरील करवाढ करून २३ लाख कोटी रुपये केंद्राने मिळवले असून त्यापैकी फक्त २ टक्के म्हणजे ३५ हजार कोटी लसीकरणावर खर्च केले गेले, असा घणाघाती शाब्दिक प्रहार वल्लभ यांनी केला. मोदींनी देशाला उद्देशून भाषण केले, त्यात काश्मीरमधील वाढता दहशतवाद, हिंसाचार, इंधन दरवाढ, महागाई याचा नामोल्लेखही नाही. मृत पावलेल्या करोना रुग्णांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही मोदींनी केले नाही, अशी टीका वल्लभ यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress demands apology central government akp

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी