आंध्र प्रदेशच्या विभाजनाला विरोध करणाऱ्या आणि सरकारविरोधात अविश्वासाच्या ठरावाची नोटीस देणाऱ्या काँग्रेसच्या लोकसभेतील सहा खासदारांची मंगळवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सब्बम हरी, जी. व्ही. हर्ष कुमार, व्ही. अरुण कुमार, एल. राजगोपाल, आर. सांबशिव राव आणि ए. साई प्रताप यांची पक्षातून हकालपट्टी केली. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या शिस्तभंग समितीने सहा खासदारांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला त्यावर सोनिया गांधी यांनी शिक्कामोर्तब केले, असे पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले.
आंध्र प्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर खासदारांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या काही दिवसांतच तेलंगणाबाबतचे विधेयक संसदेत मांडण्यात येणार असल्याचे संकेत सरकारने दिले आहेत.
सब्बम हरी आणि काही सदस्यांनी काही दिवसांपूर्वी सरकारविरोधात अविश्वासाच्या ठरावाची नोटीस दिली होती. आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यास आत्मदहनाचा इशारा हरी यांनी दिला होता. खासदारांची हकालपट्टी करून काँग्रेसने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांच्यासह अनेक सदस्यांना इशारा दिल्याचे मानले जात आहे. रेड्डी यांनी राज्याच्या विभाजनाला विरोध दर्शविला आहे.अद्यापही पक्षातील जवळपास १२ खासदारांचा राज्याच्या विभाजनाला विरोध आहे. संसदेत तेलंगणा विधेयक मांडण्यात येईल तेव्हा त्याला विरोध करण्याचा इरादा या १२ खासदारांनी व्यक्त केला. सदर १२ खासदारांमध्ये सीमांध्रातील अनंत वेंकटरामी यांचा समावेश आहे. त्यांनी अविश्वासाच्या प्रस्तावावर सही केलेली नाही. मात्र विधेयक संसदेत नामंजूर होईल, अशी पावले उचलण्याचे संकेत या खासदारांनी दिले.
सीमांध्र भागांतील एकूण २५ खासदार असून त्यापैकी काँग्रेसचे १८, वायएसआर काँग्रेसचे तीन आणि तेलुगू देसमचे चार खासदार आहेत. सीमांध्रातील खासदारांच्या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण आहे.