लोकसभा निवडणुकीनंतर देशात अस्थिर सरकार यावे, यासाठी कॉंग्रेससह तिसऱया आघाडीतील सर्वच पक्ष प्रयत्नशील आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या या नव्या चालबाजीला ओळखा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये मोदी यांनी जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये नेहमीप्रमाणे मोदी यांनी कॉंग्रेसच्या कारभारावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर देशात दुर्बळ सरकार यावे, अशीच कॉंग्रेस आणि तिसऱया आघाडीतील पक्षांची इच्छा आहे. जे स्वतः काही चांगले करू शकले नाहीत, ते दुसऱयाचे वाटोळे करायला निघाले आहेत. त्यांच्या या नव्या चालबाजीला जनतेने ओळखले पाहिजे. दिल्लीच्या गादीवर पुन्हा शासक बसवायचा की माझ्यासारख्या सेवकाला संधी द्यायची, याचा निर्णय मतदारांनी घ्यायचाय.
जनतेने कॉंग्रेसला ६० वर्षे दिली आता मला ६० महिने द्या, नामदारांना ६० वर्षे दिली आता कामदारांना ६० महिने द्या, असेही आवाहन मोदी यांनी यावेळी केले.