देश फक्त दोनच व्यक्ती चालवत आहेत. एक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे अमित शहा, अशी टीका काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी केला. नवी दिल्ली येथे आयोजित एका राजकीय कार्यक्रमात ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील अशी एकही संस्था राहिलेली नाही. ज्याचा गैरवापर या केंद्र सरकारने केलेला नाही. प्रत्येक संस्थेचा वापर ते आपल्या स्वार्थासाठी करत असल्याचा आरोपही पटेल यांनी केला.

या वेळी सर्व विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला, जेडीयू नेते शरद यादव आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. सर्वच नेत्यांच्या टीकेचा रोख केंद्र सरकार, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होता. अहमद पटेल यांनीही ही संधी सोडली नाही. त्यांनी केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरीच झाडल्या.

तत्पूर्वी, राहुल गांधी, फारुख अब्दुल्ला यांनीही टीका केली होती. देशाची सत्ता हातात येईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी कधीही तिरंग्याला वंदन केले नव्हते, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. सत्ता आहे तोपर्यंतच संघातील लोकांची देशाशी बांधिलकी आहे. देशाकडे बघण्याचे दोन दृष्टीकोन आहेत. एक दृष्टीकोन सांगतो की, हा देश माझा आहे. तर दुसरा दृष्टीकोन असतो की, मी या देशाचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेसमध्ये हाच मुलभूत फरक आहे. हा देश आमचा आहे, तुम्ही या देशाचे नाहीत, ही संघाची विचारसरणी आहे. गुजरातमध्ये दलितांना मारहाण करून संघाने हे दाखवून दिले आहे, असे गांधी यांनी म्हटले.

तर चीन किंवा पाकिस्तानपेक्षा भारतातच बसलेल्या लोकांकडून देशाला धोका आहे. हे दोन्ही देश भारताचे काहीच बिघडवू शकत नाहीत. खरा चोर तर आपल्या देशातच बसला आहे, असे वक्तव्य फारूख अब्दुल्ला यांनी केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader ahmed patel slams on pm narendra modi government amit shah
First published on: 17-08-2017 at 15:57 IST