Shashi Tharoor On Donald Trump and US Tariffs : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारताच्या संबंधांमध्ये टॅरिफच्या मुद्द्यावरून चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादलं आहे. भारत रशियाकडून खजिन तेल खरेदी करत असल्याचं कारण सांगत ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादलं. एवढंच नाही तर ट्रम्प यांनी भारताला अनेकदा डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने ट्रम्प यांच्या दबावाला जुमानलं नाही.

अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्क्याच्या टॅरिफचा फटका भारताला येणाऱ्या काळात बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या अमेरिका-भारत संबंधांबाबत ट्रम्प यांचा सूर बदलल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पण असं असलं तरी अद्याप अमेरिका आणि भारतात व्यापार करार झालेला नाही. दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनी भाष्य करत सूचक इशारा दिला आहे. ‘काही फरक पडत नाही, अशा खोट्या भ्रमात राहू नका’, असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.

शशी थरूर काय म्हणाले?

“अमेरिकेने लादलेल्या अतिरिक्त शुल्कामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार गमावले जाऊ शकतात”, असं म्हणत शशी थरूर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर घणाघात केला. ते सिंगापूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

शशी थरूर म्हणाले की, “रशियन तेल खरेदी केल्याच्या कारणास्तव ५० टक्के शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे अनेक भारतीय निर्यातदार अमेरिकन बाजारपेठेत व्यवहार करू शकणार नाहीत. आधीच अनेक लोक नोकऱ्या गमावत आहेत. सुरतमध्ये हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायात १.३५ लाख लोकांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. फूड आणि उत्पादन क्षेत्रांनाही मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. अमेरिकेच्या अतिरिक्त शुल्कामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे. त्यामुळे आपण काही फरक पडत नाही, अशा खोट्या भ्रमात राहू नये.”

“भारताला हा फटका सहन करण्यासाठी निर्यातीच्या बाजारपेठेत विविधता आणण्याची आवश्यकता आहे. अमेरिकन बाजारपेठेत प्रवेश करणं खूप कठीण होऊ शकतं. अतिरिक्त २५ टक्के कर हे शुल्क नाही तर ते एकप्रकारे निर्बंध आहेत आणि ते पूर्णपणे अन्यायकारक आहेत. कारण चीन देखील रशियाकडून तेल आणि वायू आयात करत आहे”, असं म्हणत शशी थरूर यांनी अमेरिकेला सर्व देशांसाठी एकसमान धोरण स्वीकारण्याचं आवाहन केलं.

शशी थरूर पुढे म्हणाले की, “अतिरिक्त शुल्काचा भारतावर नकारात्मक परिणाम झाला आहे. मात्र, आता भारताकडे कंबर कसून पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही. तसेच भारताने युरोप, चीन आणि रशियाशी मजबूत संबंध केले पाहिजेत. भारताची जागतिक पातळी वाढविण्यासाठी भारताने त्याच्या बाजारपेठा आणि राजनैतिक मार्गांमध्ये विविधता आणली पाहिजे. आम्हाला तिथे बसून असं म्हणता येणार नाही की आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही.”