पीटीआय, अमेठी
भारतात निवडणुका होत असताना पाकिस्तानबाबत चर्चाच कशाला होतात? भारतातील बेरोजगारीचा दर गेल्या ४५ वर्षांच्या उच्चांकावर आहे. सत्ताधारी पक्षाने देशातील गंभीर मुद्दय़ांवर निवडणुका लढवाव्यात, असा सल्ला देत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वड्रा यांनी शुक्रवारी भाजपला चांगलेच फटकारले. ‘पीटीआय’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी मोदी आणि भाजपवर टीका केली.
‘निवडणुका जिंकण्यासाठीच भाजप हिंदू-मुस्लीमवरून विविध विधाने करीत आहे. परंतु लोकांना धर्म आणि जातीच्या आधारावर निवडणूक लढवायची नाही’, असे प्रियंका यांनी ठामपणे सांगितले. तुम्ही गेल्या दोन निवडणुका धर्माच्या आधारेच जिंकल्या आहेत. आता या मुद्दय़ांपासून पुढे जा, असे जनता म्हणत असल्याचे प्रियंका यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार किशोरीलाल शर्मा यांच्या अमेठीतील प्रचारादरम्यान ‘पीटीआय’ला सांगितले.
हेही वाचा >>>तुरुंगातून बाहेर येताच अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हुकूमशाही…”
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या पाकिस्तानबद्दलच्या वक्तव्यावरून शुक्रवारी वाद निर्माण झाला. समाज माध्यमावर प्रसिद्ध झालेल्या टिप्पण्यांमध्ये अय्यर म्हणाले, की भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे कारण ते एक सार्वभौम राष्ट्र आहे आणि त्यांच्याकडेही अणुबॉम्ब आहे. भाजपने त्यावरून पाकिस्तानची माफी मागणारा पक्ष, अशी काँग्रेसची हेटाळणी केली. अय्यर यांच्या वक्तव्यावरून उद्भवलेल्या वादावर प्रियंका यांनी, हे विधान जुने असताना आता या विषयावर चर्चा का होते, असा प्रश्न केला. निवडणुका भारतात होत आहेत की पाकिस्तानात? भारतात निवडणुका होत असताना पाकिस्तानची चर्चा आपण कशाला करतो? असा प्रश्न त्यांनी केला. प्रियंका गांधी २० मे पर्यंत रायबरेली आणि अमेठीत ठाण मांडून आहेत. काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा अमेठीतून लढत आहेत.
गंभीर मुद्दय़ांवर चर्चा करा : प्रियंका
‘गेल्या ४५ वर्षांत देशातील बेरोजगारीचा दर उच्चांकावर आहे, महागाईमुळे लोक बाजारात जातात आणि त्यांना पाहिजे असलेल्या निम्म्या वस्तू खरेदी न करता ते परत येतात, शेतकरी त्रस्त आहेत, डिझेलपासून शेतीच्या साहित्यापर्यंत सर्वच महाग झाले आहे. मजुरांचे शोषण का केले जाते आणि त्यांना पुरेशी मजुरी का मिळत नाही? देशात इतके प्रश्न असताना, त्यांवर चर्चा का होत नाही? असा प्रश्न प्रियंका यांनी केला.