Shashi Tharoor on LK Advani: काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पुन्हा एकदा भाजपा नेत्याचे कौतुक केल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. यावेळी त्यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकीय कारकिर्दीची स्तुती केली आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच भाजपाचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या सार्वजनिक जीवनातील सेवेचे मूल्यमापन एकाच घटनेच्या आधारे केले जाऊ शकत नाही, असे थरूर म्हणाले आहेत. त्यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना लक्ष्य केले.
अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “केवळ एका घटनेच्या आधारावर अडवाणी यांच्या कित्येक वर्षांच्या योगदानाकडे कानाडोळा करणे, हे अन्यायकारक ठरू शकते. जसे की, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची कारकीर्द फक्त चीनकडून मिळालेल्या पराभवाच्या आधारावर पाहता येणार नाही. तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची कारकीर्द केवळ आणीबाणीच्या अनुषंगाने पाहता येणार नाही. त्याचप्रमाणे अडवाणी यांच्याकडेही निष्पक्षतेने पाहिले पाहिजे.”
भाजपाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या अडवाणींच्या ९८ व्या वाढदिवसानिमित्त थरूर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने थरूर यांनी अडवाणींच्या कामाची स्तुती केली.
“लालकृष्ण अडवाणी यांना ९८ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सार्वजनिक जीवनात त्यांची वचनबद्धता, त्यांची नम्रता आणि शालीनता, आधुनिक भारताच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांचे जीवन खरंच अनुकरणीय आहे”, असे थरूर म्हणाले.
थरूर यांनी लालकृष्ण अडवाणी यांचे कौतुक केल्यानंतर त्यांच्यावर टीकाही होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टखाली अनेकांनी टीकेचा सूर उमटवला आहे. अडवाणी यांच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाला स्वच्छ प्रतिमा चढविण्याचे काम थरूर करत आहेत, असा आरोप काहींनी केला.
सर्वोच्च न्यायालयाचे वकील संजय हेगडे यांनी थरूर यांच्या पोस्टला प्रत्युत्तर देताना म्हटले की, या देशात द्वेषाचे बीज पेरणे ही सार्वजनिक सेवा असू शकत नाही.
हेगडे म्हणाले, रथयात्रा हा केवळ एक एपिसोड नव्हता. तर तो भारताच्या प्रजासत्ताकच्या मूलभूत तत्त्वांना उलट फिरवणारा एक लांबचा प्रवास होता. यामुळे २००२ आणि २०१४ नंतरच्या काळाची सुरुवात झाली. ज्याप्रमाणे द्रौपदीच्या अपमानाने महाभारताची सुरुवात झाली, त्याचप्रमाणे रथयात्रेच्या माध्यमातून देशाला हिंसाचाराचे ग्रहण लागले. हा वारसा देशाला अजूनही छळत आहे.
काँग्रेसने हात झटकले
खासदार शशी थरूर यांच्या विधानानंतर काँग्रेसने त्यांच्या भूमिकेपासून अंतर राखले आहे. काँग्रेसच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष पवन खेरा म्हणाले, “नेहमीप्रमाणे डॉ. शशी थरूर यांनी स्वतःची आणि काँग्रेस पक्षाच्या धोरणापासून वेगळी भूमिका मांडली आहे. काँग्रेसचे खासदार आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून ते अधूनमधून असे करत असतात. काँग्रेसमध्ये असलेल्या लोकशाही आणि उदारमतवादी भावनेचेच हे प्रतिबिंब आहे.”
