Congress leader Udit Raj claims family forcible eviction from government bungalow : काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार उदित राज यांनी शुक्रवारी गंभीर आरोप केला आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट असताना देखील त्यांच्या कुटुंबीयांना नवी दिल्लीतील त्यांच्या पंडारा पार्क बंगल्यातून बळजबरीने बाहेर काढण्यात आल्याचे उदित राज म्हणाले आहेत.
हा सरकारी बंगला माजी खासदार राज यांच्या पत्नी आणि निवृत्त आयआरएस अधिकारी सीमा राज यांना देण्यात आला होता. ज्यांनी सांगितले की त्यांनी या वर्षीच्या ३१ मे पर्यंत लायसन्स फी भरली आहे. दरम्यान हिंदूस्तान टाईम्सच्या रिपोर्टमनुसार, अद्याप बंगला खाली करण्याच्या संदर्भात सरकारकडून कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेले नाही.
नेमकं प्रकरण काय आहे?
बंगल्यातून कुटुंबीयांना बाहेर काढण्याबाबत उदित राज यांच्या पत्नी सीमा यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी दावा केला की, त्यांची सेवानिवृत्ती ३० नोव्हेंबर रोजी होती आणि त्यांनी दावा केला की त्यांना अजून सहा महिने सरकारी निवासस्थानाचा ताबा ठेवण्याचा अधिकार होता.
“मी लायसन्स फी भरली होती. माझे वडील खूप आजारी होते आणि त्यांचे नुकतेच निधन झाले. मी सातत्याने डायरेक्टर ऑफ इस्टेट यांना पत्र लिहून दुसऱ्या घराची व्यवस्था करण्यासाठी काही वेळ देण्याची विनंती केली… मी ३० मे नंतर मार्केट दराने भाडे देईन असेही म्हणाले….” असे सीमा यांनी सांगितल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
इतकेच नाही तर त्यांनी असेही सांगितले की त्यांनी नवीन घर शोधण्यासाठी नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचा वेळ मागितला होता. त्या पुढे म्हणाल्या की,सप्टेंबरमध्ये न्यायालयात अपील केल्यानंतर, या प्रकरणाची सुनावणी २८ ऑक्टोबर रोजी होणार होती. “ज्या दिवशी न्यायलय बंद आहेत अधिकारी मुद्दाम त्या दिवशी आले,” असेही त्या म्हणाल्या.
उदित राज यांची टीका
यादरम्यान उदित राज यांनी या कारवाईवर जोरदार टीका केली आहे. भाजपा नेत्यांच्या इशाऱ्यावर सामान बाहेर फेकले जात असल्याचे राज म्हणाले आहेत. “आज माझे निवासस्थान जे पत्नी सीमा राज यांच्या नावावर अलॉट केलेले आहे, ते C-1/38, पंडारा पार्क, नवी दिल्ली, या ठिकाणी एक महिन्याचा अतिरिक्त वेळ मिळावा म्हणून कोर्टाद्वारे वेळ मागण्यात आला आहे आणि याची सुनावणी २८ ऑक्टोबरला आहे. कोर्टाची नोटीस असूनही, भाजपाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून आज जबरदस्तीने सामान रस्त्यावर फेकले जात आहे,” असा आरोप राज यांनी केला.
सोशल मीडियावर पोस्ट करत ते म्हणाले की, “जे मनुवादाशी प्रमाणीकपणे लढतात, त्यांना प्रत्येक अत्याचार आणि अन्याय सहन करण्यासाठी तयार राहायला हवे. काही कथित दलित-मागासवर्गीयांचे नेते आहेत जे आरएसएस आणि भाजपशी लढण्याचे ढोंग करतात, तर ते आतून मिळालेले असतात. ते अनेक घरे घेऊन बसले आहेत आणि त्यांना सुरक्षा मिळाली आहे. माझी सुरक्षा काढून घेण्यात आली आणि आज घरातून सामान फेकून दिले, तर २८ ऑक्टोबरला न्यायालयात तारीख आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि ३-४ दिवसांत काय फरक पडणार होता? घर खाली करवून घेणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, २८ तारखेला स्टे मिळाला असता, म्हणून वरून आदेश आला की त्यापूर्वीच घर खाली करा,” असे उदित राज म्हणाले आहेत.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये ते म्हणाले की, “आम्ही स्वतःहून आमच्या घरातील सामान बाहेर काढत आहोत, जेणेकरून ते सुरक्षित राहील, पण अधिकारी जबरदस्ती करत आहेत. न्यायालयात २८ ऑक्टोबरची तारीख आहे आणि मंत्रालयाला नोटीस पाठवली गेली आहे, तरीही माझ्या घरातून सामान फेकले जात आहे. दलित-मागासवर्गीय लोकांचा आवाज उठवण्याची किंमत मोजावी लागत आहे.”
