बिहारमध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवल्याचे बुधवारी पहाटे स्पष्ट झालं. बुधवारी पहाटे सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून एनडीएने १२५ जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली आहे. या १२५ जागांपैकी ७४ जागांवर विजय मिळवत भाजपा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नितीश कुमार यांच्या जदयूने ४३ जागांवर तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता नितीशकुमारच बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे स्पष्ट झालं आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे  राष्ट्रीय जनता दलाने ७५ जागा मिळवत बिहारमधला सर्वात मोठा पक्ष होण्याचा पराक्रम केला. पण राजदचा मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसला केवळ १९ जागांवर विजय मिळवता आला अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमदेवार पराभूत झाले. यामुळेच आता काँग्रेसचे प्रवक्ते उदित राज यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. राज यांनी ईव्हीएम हँकींगवरुन सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये अंमली पदार्थांच्या बाबतीत नाव समोर आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि दीपिका पादुकोण यांच्याशी संबंध जोडणारे ट्विट केलं आहे. राज यांनी या दोन अभिनेत्रींचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर येण्याचे उदाहरण देत व्हॉट्सअ‍ॅप हॅक केलं जाऊ शकतं तर ईव्हीएम का नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.

नक्की वाचा >> बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री?; नितीश यांना दिलेलं ‘ते’ आश्वासन ठरणार जुमला?

राज यांनी ट्विटमध्ये, “रिया प्रकरणामध्ये व्हॉट्सअ‍ॅप किती सुरक्षित आहे हे समोर आलं. दीपिका पादुकोणचे जुने व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर आले. आज कोणत्याही गोष्टी खासगी राहिल्या नाहीत. ईव्हीएमही इलेक्ट्रॉनिक गोष्टचं आहे. ती हॅक करणं एवढं कठीण नाहीय,” असं म्हटलं आहे.

यापूर्वीही राज यांनी ईव्हीएम हॅकिंगचासंदर्भ सॅटेलाइट नियंत्रणाशी जोडत ईव्हीएम हॅक झाल्याचा आरोप केला होता. उपग्रह पृथ्वीवरुन नियंत्रित केला जातो तर ईव्हीएम हॅक होणं काय काठीण आहे, असं राज म्हणाले होते. तसेच त्यांनी अमेरिकेमध्ये ईव्हीएमवर निवडणूक झाली असती तर डोनाल्ड ट्रम्प हरले असते का?, असा प्रश्नही विचारला होता.

मात्र त्याचवेळी दुसरीकडे काँग्रेसचे खासदार काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी, “निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी इव्हीएमला दोष देणं बंद करण्याची वेळ आहे. माझ्या अनुभवानुसार, इव्हीएम प्रणाली ही मजबूत, अचूक व विश्वासार्ह आहे,” असं मत व्यक्त  केलं आहे.