भाजपाप्रणित एनडीएविरोधात देशातील २८ विरोधी पक्ष एकवटले आहेत. या विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात आघाडी तयार केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A. (इंडिया) असं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपा नेते तसेच एनडीएतील इतर पक्षांचे नेते विरोधकांच्या आघाडीच्या नावावरून सातत्याने टीका करत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील इंडिया आघाडीवर टीका केली. नरेंद्र मोदींच्या हस्ते आज (१४ सप्टेंबर) मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील बीना रिफायनरीची पायाभरणी करण्यात आली. यावेळी केलेल्या भाषणात मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “जगातील सर्वांत प्राचीन धर्मांपैकी एक असलेल्या आपल्या सनातन धर्माचा पाया उद्ध्वस्त करण्याचा घमंडिया युतीचा दुष्ट हेतू आहे. या इंडिया आघाडीतील लोकांना स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळकांना प्रेरित करणारा सनातन धर्म संपवायचा आहे. त्यांनी आता सनातन धर्माला खुलेआम लक्ष्य केलं आहे. उद्या ते आमच्यावर हल्ले करतील. देशातील तमाम सनातनी आणि आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या लोकांनी सावध राहायला हवं. त्याचबरोबर आपल्याला अशा लोकांना रोखावं लागेल.
पंतप्रधान म्हणाले, “घमंडिया आघाडीची नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यांच्याकडे ना धोरणं आहेत, ना मुद्दे आहेत आणि नाही नेता आहे. सनातन धर्मावर हल्ला करण्याचा त्यांचा छुपा अजेंडा आहे. या धर्माचा त्यांना नाश करायचा आहे.” द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे प्रमुख आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मुलाने सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यावरून पंतप्रधानांनी इंडिया आघाडीला लक्ष्य केलं. स्टॅलिन यांचे पूत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर टीका केली होती. सनातन धर्म नष्ट करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले होते. त्याचबरोबर सनातन धर्माची डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांशी त्यांनी तुलना केली होती.
हे ही वाचा >> “खरे प्रतोद कोण? हा कळीचा मुद्दा ठरला तर…”, आमदार अपात्रतेसंदर्भात आमदार भरत गोगावले स्पष्टच बोलले
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेला काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जयराम रमेश यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की पंतप्रधानांनी पुन्हा तेच करायला सुरुवात केलीय, ज्यात ते तज्ज्ञ आहेत. त्यांनी आता अपमान करायला सुरुवात केली आहे. त्यांनी इंडिया आघाडीतल्या पक्षांना पुन्हा एकदा घमंडिया (अहंकारी) म्हटलं आहे. कोण बोलतंय बघा! शासकीय कार्यक्रमांचा वापर विरोधी पक्षांचा अपमान करण्यासाठी करणारी व्यक्ती बोलतेय. आपणही त्यांच्या स्तरावर जाऊन त्यांच्याच भाषेत बोलू शकतो. ते GA-NDA (गंदा) आघाडी – गौतम अदाणीच्या एनडीएचे प्रमुख आहेत, असं म्हणू शकतो.