Congress MP Jairam Ramesh on Pahalgam Terror Attack : गेल्या महिन्यात, २२ एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन या प्रसिद्ध पर्यटनस्थळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेतून देश अद्याप सावरण्याचा प्रयत्न करतोय. तर, देशातील सर्व तपास यंत्रणा गेल्या महिनाभरापासून पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. अद्याप चारपैकी एकही हल्लेखोर सापडलेला नाही. हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितलं होतं की पहलगाम हल्ल्यात दोन पाकिस्तानी नागरिक व दोन काश्मिरी रहिवाशांचा सहभाग आहे.

गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) या हल्ल्याचा तपास करण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र, या हल्ल्याला जवळपास एक महिना उलटला आहे. तरीदेखील अधिकारी हल्लेखोरांना पकडू शकलेले नाहीत. यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

दहशतवाद्यांना पकडण्याऐवजी सरकार खासदारांना जगभर पाठवून समर्थन मिळवू पाहतंय : जयराम रमेश

जयराम रमेश म्हणाले, “पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार करणारे दहशतवादी अजून पकडले गेले नाहीत. त्या हल्ल्याला उद्या एक महिना होईल. अद्याप त्यांच्यापैकी एकालाही पकडलेलं नाही. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हा सर्व दहशतवादी मारले गेले, त्यांच्यापैकी एकाला पोलिसांनी पकडलं होतं. त्यानंतर जगभरातून भारताला समर्थन मिळालं. आता मात्र दहशतवादी हल्ला करून, लोकांना ठार मारून मोकाट फिरत आहेत आणि आपलं सरकार खासदारांना जगभर पाठवून समर्थन मिळवू पाहत आहेत. उलट त्या दहशतवाद्यांना अटक करा, त्यांची चौकशी करा आणि त्यातून पाकिस्तानचा चेहरा जगासमोर आणायला हवा. सरकार शिष्टमंडळ पाठवून केवळ लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवू पाहतंय”.

२६/११ हल्ल्याचं उदाहरण देत जयराम रमेश यांचा मोदी सरकारला सल्ला

काँग्रेस खासदार जयराम रमेश म्हणाले, “पहलगाममधील हल्ल्याला उद्या एक महिना होईल, मात्र हल्लेखोर कुठे आहेत? अद्याप एकाही दहशतवाद्याला पकडलेलं नाही. २६/११ च्या वेळी सर्व दहशतवादी मारले गेले होते. एका दहशतवाद्याला पोलिसांनी पकडलं, ज्याला नंतर फाशी देण्यात आली. मात्र, या काळात भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थिती मजबूत झाली होती. दहशतवादी कोण होते? कुठून आले होते? हे त्यातून समोर आलं. त्यामुळे आम्हाला मोदी सरकारला सांगायचं आहे की दहशतवाद्यांना पकडा, चौकशी करा आणि जगभरातून समर्थन मिळवा”.