Sudha Ramakrishnan : दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. काँग्रेस पक्षाच्या खासदार आर सुधा यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. खरं तर सुरक्षाव्यवस्था असलेल्या भागात चोरट्यांनी एका खासदाराची सोनसाखळी चोरल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर खासदार आर सुधा यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून आर सुधा यांनी या घटनेकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं काय घडलं?

खासदार आर सुधा यांची सोन्याची साखळी चोरट्यांनी लंपास केली. ही घटना सोमवारी सकाळी दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात घडली. ही घटना घडल्यानंतर खासदार आर सुधा यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून घडलेल्या घटनेची माहिती सांगितली आर सुधा या तामिळनाडूमधील मयिलादुथुराई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. सध्या दिल्लीत पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने सर्वच खासदार दिल्लीत आहेत. या संदर्भातील वृत्त फ्रि प्रेस जर्नलने दिलं आहे.

आर सुधा या वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. सकाळी ६ वाजेच्या सुमारास एका दुचाकीवरून एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली आणि घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, यावेळी झालेल्या झटापटीत आर सुधा यांच्या गळ्याला जखम झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, यावेळी त्यांच्या बरोबर असलेल्या खासदारांनी आरडाओरडा करत मदतीची मागणी केल्यानंतर त्या ठिकाणी लोक जमा झाले.

ही घटना घडल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या पथकाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर खासदार आर सुधा यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती सांगण्यात आली आहे. यानंतर आता संबंधित घटनेची पोलीस चौकशी करत आहेत. या घटनेनंतर आर सुधा यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहित चिंता व्यक्त करत कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारले आहेत.

खरं तर दिल्लीतील चाणक्यपुरी हा परिसर मोठी सुरक्षा असलेला परिसर आहे. मात्र, तरीही अशा परिस्थितीत या ठिकाणी एका खासदाराची भरदिवसा सोनसाखळी चोरीला गेल्याने सुरक्षेबाबत प्रश्न विचारले जात आहेत. या घटनेबाबत आर सुधा यांनी पत्रात म्हटलं की, “दिल्लीतील सुरक्षा असलेल्यांपैकी एक ठिकाण म्हणजे चाणक्यपुरी. पण तरीही या भागातही अशा प्रकारची घटना घडते. खरं तर चाणक्यपुरी परिसरात विविध देशांच्या दूतावासांचे आणि काही महत्वाचे शासकीय निवासस्थाने आहेत. मात्र, तरीही अशा प्रकारची घटना या ठिकाणी घडली. त्यामुळे येथे खासदार महिला सुरक्षित नाहीत, मग सर्वसामान्य महिलांचं काय?” असा प्रश्न आर सुधा यांनी विचारला आहे. दरम्यान, या घटनेचा तपास करून आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करण्याची मागणी आर सुधा यांनी केली आहे.