काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत २६: २२ च्या फॉम्र्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कोल्हापूरसाठी आग्रही असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ‘समजूत’ काढण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आले. जागावाटप निश्चित झाले असले तरी मतदारसंघ अदलाबदलीवर आठवडाभरात निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार, पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. काँग्रेसकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते.
आठवडाभरापासून ही चर्चा सुरू होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसला निर्णायक मुदतदेखील दिली होती. त्यानंतर  मागील आठवडय़ात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. त्यात मतदारसंघनिहाय चर्चा झाली. प्रत्येक मतदारसंघातून तीन इच्छुक उमेदवारांची नावे समितीने निश्चित केली असून पुढच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल. प्रत्येकी तीन नावे खरगे पक्षश्रेष्ठींना सुचविणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रभारी मोहन प्रकाश उपस्थित होते.