गोरगरिबांची सेवा करून त्यांना ख्रिश्चन धर्मात सामावून घेणे हाच मदर तेरेसा यांचा उद्देश होता, या सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावरून गदारोळ माजल्याने भाजपच्या नेत्या मीनाक्षी लेखी भागवत यांच्या बचावासाठी सरसावल्या आहेत. जनतेला ख्रिश्चन धर्मात आणणे हाच आपला उद्देश असल्याचे स्वत: तेरेसा यांनीच एका मुलाखतीमध्ये म्हटल्याचे लेखी यांनी सांगितले काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनीही भागवत यांचा निषेध केला आहे.
या प्रश्नाचे राजकीय भांडवल करण्याची काँग्रेसची इच्छा असल्याचा आरोप लेखी यांनी केला. अशा प्रश्नांना राजकीय रूप देणे टाळणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या. जनतेचे ज्या पद्धतीने आपल्याला वर्णन करावयाचे आहे त्या पद्धतीने करू नका, अशी विनंती लेखी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांना केली
आहे.
जनतेला ख्रिश्चन धर्मात सामावून घेणे यासाठीच आपण काम करीत असल्याचे मदर तेरेसा यांनी म्हटल्याचा दावा लेखी यांनी एका पुस्तकाचा हवाला देऊन केला. नवीन चावला हे काँग्रेसशी एकनिष्ठ असून त्यांच्याच पुस्तकात हे म्हटले आहे, असे लेखी म्हणाल्या.

नितीशकुमार यांच्याकडून निषेध
पाटणा: सरसंघचालकांचे मदर तेरेसा यांच्याबद्दलचे वक्तव्य हा एखाद्याची पूर्वग्रहदूषित मानसिकता दर्शवितो, असे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी व्यक्त केले आहे. अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.मेदर तेरेसा यांनी मानवतेची ज्या प्रकारे सेवा केली त्याबद्दल अवघ्या जगाला त्यांच्याबद्दल आदर आहे, मात्र काही पूर्वग्रहदूषित मानसिकता असलेली मंडळी त्यांच्याबद्दल अशा प्रकारची वक्तव्ये करीत आहेत, असे नितीशकुमार म्हणाले.

‘तेरेसांवर टीका करणे तरी टाळावे’
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी,  भागवत यांनी मदर तेरेसा यांच्याबद्दल केलेल्या विधानावर टीका केली आहे. मदर तेरेसा यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी समर्पित केले त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे तरी ही मंडळी टाळतील, अशी अपेक्षा वढेरा यांनी व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चर्चकडून समाचार
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मदर तेरेसा यांच्याबद्दल केलेले विधान त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा केलेला अमानवी प्रयत्न असल्याचे कॅथलिक चर्चने म्हटले आहे.मदर तेरेसा यांच्यासारख्यांचे कार्य विनाकारण वादाच्या भोवऱ्यात खेचणे ही दुर्दैवी बाब आहे. धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन जनतेने तेरेसा यांना संतपद बहाल केले, असेही चर्चने म्हटले आहे.