Operation Sindoor News Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील आठवड्यात फक्त एनडीएच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची केलेली योजना ही ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या लष्करी कारवाईतून “राजकीय फायदा” मिळविण्यासाठी सत्ताधारी भाजपाचा प्रयत्न आहे, असे काँग्रेसने शुक्रवारी म्हटले आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्सवर विचारले की, “ऑपरेशन सिंदूरचा राजकीय फायदा घेण्यासाठी पंतप्रधानांनी २५ मे रोजी फक्त एनडीएच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. पण आता ते सर्व पक्षांच्या खासदारांना पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादाबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिष्टमंडळ म्हणून परदेशात जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.”

काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की, ते आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीमंडळांत निश्चितपणे सहभागी होतील. परंतु ऑपरेशन सिंदूरबाबत पंतप्रधान मोदी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना डावलत आहेत, असे सांगून त्यांनी भाजपाच्या दुहेरी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पाकिस्तानविरुद्ध भारताच्या लष्करी कारवाईदरम्यान राजकीय पक्षांमध्ये एकता निर्माण करण्याचे आवाहन केले असले तरी पंतप्रधान आणि भाजपा काँग्रेसची सतत बदनामी करत आहेत, असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.

“काँग्रेस संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत आहे, पण पंतप्रधानांनी याला सहमती दर्शविली नाही. आता अचानक पंतप्रधानांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादाबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी परदेशात बहुपक्षीय शिष्टमंडळे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेहमीच राष्ट्रीय हिताची भूमिका घेते आणि भाजपाप्रमाणे कधीही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांचे राजकारण करत नाही. म्हणूनच, काँग्रेस निश्चितच या शिष्टमंडळांचा भाग असेल,” असे ते म्हणाले.

पुढील आठवड्यापासून, एनडीए सरकारने पाकिस्तान समर्थित दहशतवादाचा पर्दाफाश करण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या लष्करी कारवाईवर प्रकाश टाकण्यासाठी एका राजनैतिक मोहिमेच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये अनेक सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवण्याची योजना आखली आहे. या शिष्टमंडळांपैकी एका शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांचा समावेश आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला

दरम्यान पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. याचाच भाग म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील तहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले.

भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. पाकिस्तानचे हे प्रयत्न निष्प्रभ ठरवत भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे.