रॉबर्ट वढेरा यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सध्या मौन धारण केले आहे. मात्र, यामागे काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण असल्याचे भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) सोमवारी सांगण्यात आले. काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे सोनिया अथवा राहुल रॉबर्ट वढेरा यांच्या बचावासाठी पुढे सरसावत नसल्याचे भाजपने सांगितले. वढेरा यांच्यावरचे आरोप हा एखाद्या कुटुंबाचा वैयक्तिक प्रश्न अथवा फक्त भ्रष्टाचाराचा मुद्दा नसल्याचे सांगत भाजप प्रवक्त्या निर्मला सितारामन यांनी पक्षाच्या भूमिकेचे समर्थन केले. रॉबर्ट वढेरा यांच्यावर आरोप करून भाजप फक्त वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रियांका गांधी यांनी सांगितले होते. मात्र,  वढेरा यांच्यावरचे आरोप हा एखाद्या कुटुंबाचा वैयक्तिक प्रश्न अथवा फक्त भ्रष्टाचाराचा मुद्दा नसल्याचे सांगत भाजप प्रवक्त्या निर्मला सितारामन यांनी पक्षाच्या भूमिकेचे समर्थन केले. तसेच प्रियांका गांधी यांचे काँग्रेस पक्षात कुठलेही अधिकृत स्थान नाही, त्यामुळे हरियाणा आणि राजस्थानमधील जमीनघोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेतृत्वाने स्पष्टीकरण दिलेच पाहिजे अशी मागणी भाजपने केली आहे. तसेच पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे देशातील महत्वपूर्ण प्रश्नांवर भाष्य करणे काँग्रेसकडून टाळले जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.