नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जातीनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाची प्रशंसा केल्यानंतर काँग्रेसने सोमवारी दोन ध्वनिचित्रफिती प्रसिद्ध करून मोदी यांच्यावर टीका केली आहे. या ध्वनिचित्रफितींमध्ये पंतप्रधान मोदी हे जातीनिहाय जनगणना घेण्याच्या विरोधकांच्या मागणीवर टीका करताना दिसत आहेत.
दिल्लीमध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रालोआशासित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी जातीनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. यामुळे विकासात मागे राहिलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक पाऊल आहे, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला होता.
काँग्रेसच्य़ा माध्यम विभागाचे प्रमुख आणि पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदी यांच्या या दोन ध्वनिचित्रफिती ‘एक्स’वरून सामायिक केल्या. रालोआ मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदी यांनी अपेक्षेप्रमाणे जातीनिहाय जनगणनेचे सर्व श्रेय घेतले अशी टीकाही रमेश यांनी केली.
अघोषित आणीबाणीची ११ वर्षे!
रालोआ मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण होत असताना काँग्रेसला लक्ष्य करण्याची रणनीती निश्चित करण्यात आली. तो धागा पकडून काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांची ११ वर्षांची राजवट ही अघोषित आणीबाणी असल्याची टीका केली. मोदींचे चांगल्या दिवसांचे आश्वासन हे वास्तवात दु:स्वप्न ठरले असल्याची टीका पक्षाने केली.
मोदींची विरोधातील वक्तव्ये
२ ऑक्टोबर २०२३च्या ध्वनिचित्रफितीत मोदी असे म्हणताना ऐकायला मिळते की, ‘‘ते (विरोधक) समाजाची जातीच्या आधारावर विभागणी करत असत आणि अजूनही ते हे पाप करत आहेत.’’ तर २८ एप्रिल २०२४ रोजी मोदी म्हणाले होते की, ‘‘जातीनिहाय जनगणनेची काँग्रेसची मागणी हा त्यांच्या शहरी नक्षली मानसिकतेचा भाग आहे.’’