भारताची गोपनीय माहिती थेट पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपावरून डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना सध्या एटीएस पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. यामुळे विरोधकांनी सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करायला सुरुवात केली आहे. प्रदीप कुरुलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. त्यामुळे यावरून संघाला लक्ष्य करण्यात येत असतानाच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात कुरुलकर स्वत:च संघाशी लहानपणापासून संबंधित असल्याचा दावा करताना दिसत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पाकिस्तानला भारताच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती पुरवल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने कुरुलकर यांना अटक केली. हनीट्रॅपमध्ये कुरुलकर फसल्याचं समोर आलं. यानंतर त्यांच्यावर खटला भरण्यात आला असून त्यांचा कसून तपास केला जात आहे. रॉकडूनही कुरुलकरांची चौकशी केली जात आहे. यातून अनेक मोठे गौप्यस्फोट समोर येण्याची शक्यात वर्तवली जात आहे.
पुणे :‘डीआरडीओ’चे संचालक कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्याचे आदेश
मल्लिकार्जुन खरगेंच्या ट्वीटची चर्चा!
खरगेंनी यासंदर्भात ट्वीट करताना सत्ताधारी आणि संघावर टीका केली आहे. “जे लोक दररोज भारतीयांना पाकिस्तानात जा म्हणत धमकावत होते, ते आता स्वत:च पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना पकडले गेले आहेत. हे आहे ‘मी देशाला झुकू देणार नाही’ म्हणणाऱ्यांच्या राष्ट्रवादाचं सत्य”, असं खरगेंनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
खरगेंनी या ट्वीटमध्ये कुरुलकरांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. यात कुरुलकर एका मुलाखतीमध्ये त्यांच्या कुटुंबाच्या चार पिढ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचं सांगताना दिसत आहेत. “माझा मुलगा आता संघ कार्यात जातो. काही प्रमाणात सहभागी होतो. ही आमच्या घरातली चौथी पिढी आहे. माझे आजोबा शाखेत जायचे. त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केलं. ते अतिशय चांगले गणिती होते. त्यांचे हिशोब पक्के होते. त्यामुळे शाखेची गंगाजळी ठेवणं, त्याची टिप्पणं ठेवणं असं काम त्यांच्याकडे असायचं. ते कालानुरूप माझ्या वडिलांकडेही ती जबाबदारी आली. १९८२ ते १९९६ या १४ वर्षांच्या काळात मी पुण्याच्या शाखेत सॅक्सोफोन वाजवत होतो”, असं कुरुलकर या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.