Mallikarjun Kharge on MP Ram Chander Jangra remark: भाजपाचे हरियाणामधील राज्यसभेचे खासदार रामचंद्र जांगरा यांनी पहलगाम हल्ल्यात ज्यांनी आपल्या घरातील पुरूष गमावला त्या महिलांबद्दल वादग्रस्त आणि असंवेदनशील विधान केले होते. या विधानावर आता काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून भाजपा अशा वाचाळवीर नेत्यांवर टीका का करत नाही? असा सवाल काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर पोस्ट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच यासंबंधी जाब विचारला आहे. यासाठी त्यांनी भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांची यादी आणि त्यांचे विधानही दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेतृत्वाचे मौन हे खासदार जांगरा यांच्या विधानाला मान्यता दिल्याचे द्योतक आहे. पहलगामच्या पीडितांना आणि सैन्यदलाला बदनाम करण्यासाठी भाजपा नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे, अशी टीका खरगे यांनी केली.

मल्लिकार्जुन खरगे यांनी लिहिले की, भाजपाचे खासदार रामचंद्र जांगरा यांनी अपमानजनक विधान केले असून त्यातून भाजपा-संघाची मानसिकता दिसून येत आहे. मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी आपल्या शूरवीर सैन्याचा अवमान केला. पण मोदीजी शांत राहिले. मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत अभद्र टिप्पणी केली. त्यांच्यावर आजवर कारवाई झालेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहलगामच्या हल्ल्यात नौदलाचे अधिकारी शहीद झाले. त्यांच्या पत्नीला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. त्यावेळीही पंतप्रधान मोदी शांत राहिले. पंतप्रधान मोदी काही दिवसांपूर्वी म्हणाले की, माझ्या नसांमध्ये रस्त नाही तर सिंदूर वाहते. जर हे खरे असेल तर भाजपाच्या वाचळवीर नेत्यांची तुम्ही हकालपट्टी करायला हवी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.