कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही याची जाणीव तुम्हाला एक दिवस होईल अशा शब्दांत त्यांनी भाजपाला सुनावलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून प्रियंका गांधी यांनी ही टीका केली आहे. कर्नाटकमधील सत्तानाटय़ अखेर तीन आठवडय़ांनी मंगळवारी संपुष्टात आले. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ९९, तर विरोधात १०५ मते पडल्याने कुमारस्वामी सरकार कोसळले असून, भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही याची जाणीव एक दिवस भाजपाला होईल. प्रत्येकाला धमकावलं जाऊ शकत नाही. प्रत्येक खोटं एकदिवस उघडं पडतं”.

काँग्रेस-जेडीएस सत्ताधारी आघाडीतील बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर अनेक दिवस लांबलेल्या शक्तिपरीक्षेत एच. डी. कुमारस्वामी सरकारचा पराभव झाला. सत्ताधारी काँग्रेस-जेडीएस आघाडीतील १६ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कुमारस्वामी सरकार अडचणीत आले होते. सरकार वाचविण्यासाठी आघाडीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मुंबईत तळ ठोकलेल्या १३ बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही सत्ताधाऱ्यांनी केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले. अखेर कुमारस्वामी यांनी गेल्या गुरुवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. मात्र, राज्यपाल वजुभाई वाला यांनी ठरावावरील मतदानासाठी दिलेल्या दोन मुदती सत्ताधाऱ्यांना पाळता आल्या नाहीत.

अखेर विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी मंगळवारी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतले. ‘काँग्रेस-जेडीएस सत्ताधारी आघाडीला ९९ मते मिळाली, तर विरोधी पारडय़ात १०५ मते पडली. कुमारस्वामी सरकार विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात अपयशी ठरले आहे,’ अशी घोषणा रमेशकुमार यांनी केली.