काँग्रेसचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी घेऊन सुषमा स्वराज यांनी ललित मोदींना ब्रिटनची प्रवासविषयक कागदपत्रे मिळवून दिली होती का? हे भाजपने स्पष्ट करावे, अशी मागणी करीत काँग्रेसने सुषमा स्वराज प्रकरणावरून केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
आयपीएल सट्टेबाजी, पैशाची अफरातफर आदी प्रकरणी शेकडो कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारामध्ये आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी अडकलेले असताना स्वराज यांनी अशा फरार आरोपीला का मदत केली? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला. तसेच या मदतीमागे मोदींचीही सहमती होती का अशी विचारणाही करण्यात आली आहे.
दरम्यान, ललित मोदी यांना मदत केल्यामुळे वादाच्या भोवऱयात सापडलेल्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जोरदार निदर्शने केली. सुषमा स्वराज यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
कॉंग्रेसचे शेकडो कार्यकर्ते पक्षाचे झेडे घेऊन सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानाबाहेर जमले होते. त्यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. त्याचबरोबर त्यांच्या प्रतिमेचे प्रतिकात्मक दहनही करण्यात आले. दिल्ली पोलीसांनी रविवारपासूनच सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jun 2015 रोजी प्रकाशित
‘पंतप्रधानांच्या सहमतीनेच स्वराज यांची ललित मोदींना मदत?’
सुषमा स्वराज यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

First published on: 15-06-2015 at 04:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress protests outside sushma swarajs residence