काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून यासंदर्भात टीका केली जात असताना विरोधकांकडून मात्र यात्रेचं मोठ्या प्रमाणावर समर्थन केलं जात आहे. अनेक सेलिब्रिटी मंडळीही यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या यात्रेदरम्यान काही वेळा राहुल गांधींनी केलेली वादग्रस्त विधानंही चर्चेत राहिली आहेत. मात्र, एकूणच या यात्रेसंदर्भात नेमकी राहुल गांधींची काय भूमिका आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. याबाबत हरयाणामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी त्यांच्या भारत जोडो यात्रेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी थेट महाभारतातील अर्जुनानं माशाच्या डोळ्यात बाण मारण्याचा पण जिंकल्याच्या प्रसंगाचं उदाहरण दिलं. तसेच, भगवान श्रीकृष्णांनी भगवत गीतेमध्ये केलेला एक उल्लेखही त्यांनी उत्तरात सांगितला. काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
“काम करा, जे व्हायचंय ते होणार”
“जेव्हा अर्जुन माशाच्या डोळ्यात बाण मारत होता, तेव्हा त्यानं तु्म्हाला सांगितलं होतं का की माशाच्या डोळ्यात बाण मारल्यानंतर तो काय करणार आहे? नव्हतं ना सांगितलं? त्या कथेचा एक अर्थ आहे. तो भगवत गीतेमध्येही आहे. तुम्ही काम करा, जे व्हायचंय ते होणार. पण तुमचं लक्ष कामावर केंद्रीत ठेवा. भारत जोडो यात्रेमागचा विचारही तोच आहे. यात्रेनंतर अजून एक काम होईल. त्यानंतर कदाचित अजून एक काम होईल. मग कदाचित तुम्हाला उत्तर मिळेल”, असं राहुल गांधी आपल्या उत्तरात म्हणाले आहेत.
“मला देशात हाच बदल घडवून आणायचाय”
दरम्यान, यावेळी बोलताना राहुल गांधींनी शेतकरी आणि मजुरांचा मुद्दाही उपस्थित केला. “हा देश तपस्वींचा आहे. लोक म्हणाले की बघा राहुल गांधी किती किलोमीटर चालले. पण लोक हे का म्हणत नाहीत की शेतकरी किती किलोमीटर चालतो. देशाचा एकही शेतकरी असा नसेल जो माझ्यापेक्षा जास्त नाही चाललाय. देशातला एकही मजूर असा नाही सापडणार, जो माझ्यापेक्षा कमी चाललाय. आपण हे का नाही म्हणत, बघा, मजूर किती किलोमीटर चाललाय. कारण आपण तपस्येचा सन्मान करत नाही. मी करतो. मला देशात हाच बदल घडवून आणायचा आहे”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
Bharat Jodo Yatra : सेम टू सेम राहुल गांधी! कोण आहेत भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले फैसल चौधरी?
भारत जोडो यात्रा सध्या हरियाणामध्ये दाखल झाली आहे. हरियाणातही यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.