काँग्रेस खासदार राहुल गांधी गेल्या काही महिन्यांपासून ‘भारत जोडो’ यात्रेमुळे देशभरात चर्चेत राहिले आहेत. सत्ताधारी भाजपाकडून त्यांच्या यात्रेवर जोरदार टीका केली जात असताना अनेक विरोधी पक्षांनी राहुल गांधींच्या यात्रेला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने देशात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची चर्चा सुरू असताना त्यांच्या शिक्षणाविषयी नवी माहिती समोर आली आहे. राहुल गांधींच्या नावासमोर नेहमीच मोठमोठ्या पदव्यांची नावं लागल्याचं पाहायला मिळतं. यासंदर्भात आता खुद्द राहुल गांधी यांनीच माहिती दिली आहे. ‘करली टेल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राहुल गांधींनी नेमकं किती शिक्षण घेतलंय, याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजीव गांधींच्या निधनामुळे हार्वर्डमधून परतावं लागलं होतं!

या मुलाखतीमध्ये राहुल गांधींनी देशातील अनेक राजकीय मुद्द्यांवर आणि भारत जोडो यात्रेवर उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांवर सविस्तर उत्तरे दिली. यावेळी त्यांना त्यांच्या शिक्षणाविषयीही विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी त्याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच, राजीव गांधी यांची हत्या करण्यात आल्यानंतर त्यांना हार्वर्ड विद्यापीठातून परत यावं लागलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

“मी एका वर्षासाठी सेंट स्टिफनला होतो. तिथे मी इतिहास शिकलो. त्यानंतर मी हार्वर्ड विद्यापीठात गेलो. तिथे मी आंतरराष्ट्रीय संबंध आणि राज्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. पण त्यादरम्यान बाबांचं निधन झालं आणि मला तिथून परत यावं लागलं. कारण तिथे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता”, अशी माहिती राहुल गांधींनी या मुलाखतीमध्ये दिली.

मास्टर्स इन फिलॉसॉफी – इकोनॉमिक्स!

राहुल गांधींनी अर्थशास्त्रावर भर असणारी ‘मास्टर्स इन फिलॉसॉफी’ पदवी मिळवल्याचं त्यांनी सांगितलं. “हार्वर्डमधून परतल्यानंतर मी अमेरिकेत फ्लॉरिडामधल्या एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे मी आंतरराष्ट्रीय संबंध आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. त्यानंतर मी केम्ब्रिजमध्ये माझं पदव्युत्तर शिक्षण घेतलं. तिथे मी विकासात्मक अर्थशास्त्राचा अभ्यास केला. त्याला मास्टर्स इन फिलॉसॉफी म्हणतात, पण ती अर्थशास्त्रामध्ये होती”, अशी माहिती राहुल गांधींनी या मुलाखतीमध्ये दिली. “केम्ब्रिज आणि हार्वर्ड या दोन्ही उत्तम दर्जाच्या शिक्षण संस्था आहेत”, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress rahul gandhi education news special interview bharat jodo yatra pmw
First published on: 24-01-2023 at 10:23 IST