नवी दिल्ली : अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी विजय मिळवत इतिहास रचला. परंतु, ममदानी जेव्हा बोलतात, तेव्हा पाकिस्तानचे जनसंपर्क अधिकारी निवांत असतात, अशी टीका काँग्रेस खासदार अभिषेक सिंघवी यांनी गुरुवारी केली. तर भाजपच्या खासदार कंगना रानौत यांनीही संघवी यांच्या सुरात सूर मिसळत भारतीय वंशाचे ममदानी भारतापेक्षा पाकिस्तानचे जास्त वाटतात, अशी टीका केली.
चित्रपट निर्मात्या मीरा नायर आणि भारतीय वंशाचे युगांडातील लेखक महमूद ममदानी यांचे पुत्र असलेले जोहरान ममदानी यांनी मंगळवारी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदासाठी डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये मोठा विजय मिळविला. परंतु ‘जेव्हा जोहरान ममदानी तोंड उघडतात तेव्हा पाकिस्तानची ‘पीआर टीम’ सुट्टी घेते. न्यूयॉर्कमधून काल्पनिक गोष्टी कथन करणाऱ्या त्यांच्यासारख्या सहयोगी शत्रूंची भारताला गरज नाही,’ असे सिंघवी यांनी ‘एक्स’ संदेशात म्हटले आहे.
भाजपच्या राज्यसभा खासदार रानौत यांनीही सिंघवी यांच्या वक्तव्याला सहमती दर्शवली. ‘जोहरान यांची आई पद्माश्री मीरा नायर सर्वोत्तम चित्रपट निर्मात्या आहेत. भारतात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मीरा यांनी मेहमूद ममदानी (गुजराती वंशाचा) या प्रसिद्ध लेखकाशी लग्न केले. त्यांचा मुलगा जोहरान भारतीयांपेक्षा जास्त पाकिस्तानी वाटतो,’ अशी टीका त्यांनी ‘एक्स’वरून केली आहे. ‘ते आता हिंदू धर्म पुसून टाकण्यास तयार आहेत, व्वा…सगळीकडे हीच परिस्थिती आहे, असेही रनौत यांनी नमूद केले.