माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) आमंत्रण स्वीकारल्यामुळे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मुखर्जी यांनी हे आमंत्रण स्वीकारायला नको होते, अशी भावना बोलून दाखवली आहे. परंतु, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र मुखर्जींना पाठिंबा दिला आहे. प्रणव मुखर्जींनी आरएसएसचे निमंत्रण स्वीकारण्यात काहीच चुकीचे नाही. कारण ते एक धर्मनिरपेक्ष आणि विचारशील व्यक्ती आहेत. ते नेहमी धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन जनतेसमोर ठेवतात आणि संघाच्या कार्यक्रमातही ते हीच भूमिका कायम ठेवतील. संघाच्या मंचावरून भाषण देणे खूप महत्वपूर्ण आहे. त्यांच्या विचारांनी संघात सुधारणा झाली तर आम्हाला आनंदच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिंदे हे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी मुखर्जींना संघाद्वारे मिळालेल्या आमंत्रणाबाबत भाष्य केले. ते म्हणाले, मुखर्जींनी आरएसएसचे निमंत्रण स्वीकारणे गैर नाही. जर त्यांच्या विचारांनी संघात काही सुधारणा झाली तर आम्हाला आनंदच आहे, असे ते म्हणाले. नागपूर येथे संघ मुख्यालयात स्वयंसेवकाचे प्रशिक्षण शिबीर ‘संघ शिक्षा वर्ग’च्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी मुखर्जी यांना आमंत्रण दिले आहे. हा कार्यक्रम दि.७ जून रोजी होणार आहे.

जम्मू-काश्मीरबाबत शिंदे म्हणाले की, मी गृहमंत्री असताना एक-दोन घटना घडायच्या. तेव्हा भाजपा खासदार म्हणत की, आमचा एक गेला तर त्यांचे ११ आम्ही तेथून घेऊन येऊ. आता सरकार त्यांचे आहे, गुप्तचर विभाग त्यांचे आहे. पण दगडफेकीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.