अभिनेत्री ते राजकीय नेत्या असा प्रवास करणाऱ्या तामिळनाडूतील काँग्रेस नेत्या खुशबू सुंदर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. सोमवारी खुशबू यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवला होता.

गेल्या कित्येक दिवसांपासून खुशबू सुंदर यांच्या भाजपा प्रवेशाविषयी चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या होत्या. याचदरम्यान त्या रविवारी दिल्लीत गेल्या आणि त्यानंतर त्यांनी सोमवारी सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. विशेष म्हणजे या राजीनाम्यासोबत त्यांनी एक पत्रदेखील सोनिया गांधी यांना दिलं असून त्यात पक्षातील काही वरिष्ठांवर आरोप केले आहेत.


दरम्यान, २०१४ पासून त्यांचा काँग्रेसमध्ये सक्रीय सहभाग होता.मात्र, आता त्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तसंच तामिळनाडूमध्ये २०२१ च्या विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर तेथील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे.