पीटीआय, नवी दिल्ली
कोलकाता येथे डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांवरील गुन्ह्यांबाबत केलेल्या वक्तव्याचे काँग्रेसने गुरुवारी स्वागत केले. मात्र केवळ एक प्रदेश किंवा राज्य नव्हे तर संपूर्ण देशाचा आक्रोश राष्ट्रपतींनी व्यक्त करावा, अशी अपेक्षा काँग्रेसने व्यक्त केली. ‘आता पुरे झाले’, असा संताप व्यक्त करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी सांगितले की, भारताने महिलांवरील गुन्ह्यांच्या विकृतीबद्दल जागृत होण्याची आणि महिलांना कमी सामर्थ्यवान, कमी सक्षम, कमी हुशार समजणाऱ्या मानसिकतेचा प्रतिकार करण्याची वेळ आली आहे.

राष्ट्रपती मुर्मू यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा म्हणाले, ‘‘मी या विधानाचे आणि राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाचे स्वागत करतो. संपूर्ण देश संतापला आहे. त्यामुळे राष्ट्रपती ज्या संतापाची भावना व्यक्त करत आहेत, त्याचे प्रतिनिधित्व करणे स्वाभाविक आहे. परंतु देशाचा आक्रोश हा केवळ कोलकात्याच्या घटनेबद्दल नाही, तर तो फारुखाबाद, कोल्हापूर, बदलापूर, पुणे, रत्नागिरी, जोधपूर, कटनी अशा अनेक घटनांबाबत आहे. उत्तर प्रदेशात दररोज अशा प्रकारची एक तरी घटना होत आहे. त्याबाबतही त्यांनी बोलावे.’’

हेही वाचा : मुस्लीम विवाह नोंदणी बंधनकारक, आसाममध्ये विधेयक मंजूर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मणिपूर घटनेवर राष्ट्रपती का बोलत नाहीत?’

महिलांवरील अत्याचारामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भयकंपित झाल्या आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी किमान संवेदना व्यक्त केली. पण राष्ट्रपती झाल्या तेव्हाच मणिपूर दुर्घटना घडली होती. त्यावेळी महिला अत्याचाराबद्दल त्या बोलल्या असत्या तर पुढच्या अनेक घटना टळल्या असत्या, असे प्रतिपादन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. सध्या देशात हात लावीन, तेथे सत्यानाश अशी ‘मोदी गॅरंटी’ सुरू झाली आहे, अशा शब्दात ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदी महाराष्ट्रात येऊन बंगालवर बोलतात की बदलापूरवर ते बघायचे आहे, असेही ते म्हणाले.