कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. १० मे ला कर्नाटकातील २२४ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तर, १३ मे विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटकात सत्तेवर येण्यासाठी ११३ चे बहुमत असण्याची गरज आहे. अशातच कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांड्या जिल्ह्यातील बेनिवहल्ली येथे ‘प्रजा ध्वनी यात्रा’ आयोजित केली होती. तेव्हा रोड शोदरम्यान डीके शिवकुमार यांनी काही लोकांवर नोटा उधळल्या होत्या. डीके शिवकुमार ५००-५०० रुपयांच्या नोटा उधळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.

हेही वाचा : एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय, ट्विटरचा लोगो बदलला, नवा लोगो कोणता? पाहा…

अशात नोटा फेकल्याप्रकरणी मांड्या येथील स्थानिक न्यायालयाने डीके शिवकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार, मांड्या ग्रामीण पोलिसांनी डीके शिवकुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलीस डीके शिवकुमार यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, रोड-शो वेळी ढोल-ताशे वाजवणाऱ्या कलाकारांना डीके शिवकुमार हे बक्षीस म्हणून पैसे देत होते, असं काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं.

हेही वाचा : “मित्रा, थोडा शांत राहा” शशी थरूर यांनी एस. जयशंकर यांना का दिला सल्ला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता

अलीकडेच ‘एबीपी न्यूज’ आणि ‘सी व्होटर’ने एकत्ररित्या केलेला सर्व्हे समोर आला होता. या सर्व्हेत २४ हजार ७५९ हजार लोकांची मते जाणून घेण्यात आली आहे. त्यानुसार काँग्रेसला ११५ ते १२७ जागा मिळू शकतात. भाजपाला ६८ ते ८० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, जनता दल (सेक्युलर) या पक्षाचे २३ ते ३५ उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.