आर्थिक फसवणूक प्रकरणी अटकेत असणारा महाठग सुकेश चंद्रशेखर याने कारागृहातून आणखी एक पत्र जारी केल असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पक्षाचे नेते सत्येंदर जैन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुकेशने पत्रातून अरविंद केजरीवाल यांना उघडं पाडण्याचा इशारा या पत्रातून दिला आहे.
सुकेशने पत्रात दिल्ली महापालिका आणि गुजरात विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केला आहे. “तुमचं राजकारण संपण्याची ही सुरुवात आहे. तुमचे खरे रंग समोर येत असून तुम्हाला लोक नाकारतील. तुमच्या सर्व गोष्टी जगासमोर येतील याची मी खात्री करेन,” असं इशाराच सुकेशने दिला आहे.

पत्रात सुकेशने हे पत्र लिहिण्यासाठी आपल्यावर कोणताही दबाव नसून, स्वच्छेने लिहित असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्याने अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करत म्हटलं की “केजरीवालांनी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना पत्र लिहून भाजपा आपल्याला त्यांच्या विरोधात लिहिण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप करण्यास सांगितलं होतं”.


“निवडणुकीच्या आधीही आणि आत्ताही मी केलेली विधानं आणि पत्रं यावर मी ठाम असून ती मीच लिहिली आहे. माझ्यावर कोणताही दबाव किंवा कोणाचंही मार्गदर्शन नव्हतं. मी जे काही लिहिलं किंवा सांगितलं आहे ते सर्व खरं आहे,” असंही सुकेशने म्हटलं आहे. आपल्या पत्रामुळेच गुजरात विधानसभा निवडणुकीत आपचा पराभव झाल्याचा दावा सुकेशने केला आहे.