Charlie Kirk Shot Dead: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते ३१ वर्षीय चार्ली कर्क यांची गुरूवारी युटा व्हॅली विद्यापीठात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ‘द अमेरिकन कमबॅक’ आणि ‘प्रूव्ह मी राँग’ अशा घोषणांनी रंगविलेल्या तंबूमध्ये विद्यार्थ्यांसमोर भाषण करत असताना कर्क यांच्यावर गोळी झाडण्यात आली. मानेला गोळी लागल्यामुळे कर्क यांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विद्यार्थी घाबरून सैरावैरा पळताना दिसत असून कर्क मानेला घट पकडून बसल्याचे दिसत आहे.
कर्क यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी रविवारपर्यंत अमेरिकेचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस यंत्रणांनी अद्याप मारेकरी यांच्याबाबतची कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. ट्रुथ या सोशल मीडिया साईटवर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले, “आपण सर्वांनी चार्ली कर्कसाठी प्रार्थना केली पाहिजे. तो एक उत्तम माणूस होता. त्याच्या आत्म्याला शांती मिळो.”
टर्निंग पॉइंट या उजव्या विचारसरणीच्या संघटनेचे चार्ली कर्क सह-संस्थापक होते. ‘अमेरिकन कमबॅक’ दौऱ्यानिमित्त ते युटा व्हॅली विद्यापीठात भाषण करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. व्हायरल व्हिडीओमध्ये कर्क मोठ्या गर्दीसमोर एका तंबूखाली भाषण करत असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात एक गोळी त्यांच्या मानेला लागल्यामुळे ते टेबलावरून खाली पडताना दिसतात. विद्यापीठापासून २०० यार्ड अंतरावर असलेल्या इमारतीच्या गच्चीवरून गोळीबार केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
मारेकरी अद्याप फरार
गोळीबारानंतर काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते, मात्र चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले, अशी माहिती एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी दिली.
कर्क यांच्या मृत्यूनंतर वृत्तवाहिनीवर बोलत असताना ट्रम्प यांनी चार्ली कर्क देशभक्त असल्याचे म्हटले. स्वातंत्र्य, लोकशाही, न्याय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आग्रहामुळे कर्क यांनी लाखो अमेरिकन तरूणांना प्रेरित केले होते. त्यांच्या कुटुंबियाप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. तसेच मारेकऱ्यांना शोधून त्यांना योग्य शिक्षा देईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी खात्री देतो.
चार्ली कर्क कोण होते?
रूढीवादी विचारांची थेटपणे मांडणी करणारे चार्ली कर्क हे ट्रम्प यांचे जवळचे सहकारी होते. करोना महामारीबद्दल त्यांनी चुकीची माहिती पसरवली होती, तसेच हवामान बदल असा काही प्रकारच नसल्याचाही त्यांचा दावा होता.
सीएनएनच्या वृत्तानुसार, मागच्या वर्षी अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत कर्क यांच्यामुळे ट्रम्प यांना तरूणांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. याबद्दल ट्रम्प यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले होते.