राजस्थानच्या जालौर येथे राहणारी गंगाकुमारीची मेहनत अखेर फळाला आली. मोठ्या संघर्षानंतर राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गंगाकुमारीला राजस्थान पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पोलिसांत काम करणारी राजस्थानातील ती पहिली तृतीयपंथी ठरली आहे.

२४ वर्षीय गंगाकुमारीचा हा प्रवास सोपा नव्हता. तिने राजस्थान उच्च न्यायालयात दोन वर्षे लढा दिल्यानंतर तिला हे यश मिळाले. पोलिसांनी गंगाकुमारीला कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त करावे, असा आदेशच उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. पोलीस विभागाने तृतीयपंथी असल्याचे कारण देत गंगाकुमारीला नोकरी देण्यास नकार दिला होता. न्या. दिनेश मेहता यांनी हा प्रकार लैंगिक भेदभावाचा असल्याचे सांगत सहा आठवड्याच्या आत गंगाकुमारीला नियुक्ती देण्याचा आदेश दिला होता.

राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील रानीवारा परिसरात राहणारी गंगाकुमारी वर्ष २०१३ मध्ये पोलीस भरती परीक्षेत उत्तीर्ण झाली होती. वैद्यकीय चाचणीत तिची नियुक्ती रोखण्यात आली होती. चाचणीत गंगाकुमारी ही तृतीयपंथी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर गंगाकुमारीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दोन वर्षांच्या संघर्षानंतर गंगाकुमारीला यश मिळाले.