वृत्तसंस्था, नवी दिल्ली : समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ५ सदस्यीय घटनापीठाची स्थापना केली. त्यात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल, न्या. रवींद्र भट, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. एस. नरसिंह यांचा समावेश आहे.

  या याचिकांवरील सुनावणी १८ एप्रिलला सुरू होणार आहे. यापूर्वी १३ मार्चला झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. जे. बी. पारदीवाला यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने या याचिका सुनावणीसाठी घटनापीठाकडे पाठवल्या होत्या. स्वत:च्या मर्जीने विवाह करण्याचा अधिकार ‘एलजीबीटीक्यूआयए’ समूहाच्या नागरिकांनाही मिळायला पाहिजे, अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून या याचिकांना विरोध करण्यात आला आहे. जोडीदार म्हणून एकत्र राहणे आणि समलिंगी लोकांमध्ये लैंगिक संबंध असणे हे भारतीय कुटुंबव्यवस्थेशी जुळणारे नाही, असे केंद्राचे म्हणणे आहे.