पीटीआय, नवी दिल्ली : चंद्रयान-३ मोहिमेला मिळालेल्या यशामुळे इस्रोवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. त्याचवेळी या मोहिमेमध्ये खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील अनेक कंपन्यांचा त्यामध्ये समावेश आहे. तसेच केरळचे उद्योगमंत्री पी राजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील सहा सार्वजनिक क्षेत्रातील आणि २० खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी चंद्रयान-३ मोहिमेमध्ये आपले योगदान दिले.
टाटा कन्सल्टिंग इंजीनियिरग लिमिटेड (टीसीई) या कंपनीने अद्वितीय आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने महत्त्वाच्या प्रणाली आणि उप-प्रणालींची बांधणी केली. त्यामध्ये सॉलिड प्रोपेलंट प्लँट, व्हेईकल असेंब्ली बिल्डिंग आणि मोबाईल लाँच पेडस्टल यांच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली. लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) या कंपनीने चंद्रयान-३ मोहिमेसाठी विविध घटकांचा पुरवठा केला. कंपनीच्या पवई येथील कारखान्यात मधील भाग आणि नोझल बकेट फ्लँग यांची निर्मिती केली तर जमीन व उड्डाण अम्बिलिकल प्लेट यांची निर्मिती कोईम्बतूरला करण्यात आली. वालचंदनगर इंडस्ट्रीजने प्रक्षेपकाचे काही भाग, पहिल्या टप्प्याचे बुस्टर आणि ८० फूट उंचीची व १२ फुटांपेक्षा जास्त व्यासांची फ्लेक्स नोझल कंट्रोल टँक यांची निर्मिती केली. गोदरेज अँड बॉयस या कंपनीने एल११० इंजिन आणि सीई२० इंजिन थ्रस्ट चेंबरच्या निर्मितीमध्ये योगदान दिले.
सेंटम इलेक्ट्रॉनिक्सने एलव्हीएम३ एम४ साठी अत्यंत महत्त्वाचे २०० पेक्षा जास्त मोडय़ूल आणि उपयंत्रणा पुरवल्या. अनंत टेक्नॉलॉजिज (एटीएल) या कंपनीने प्रक्षेपकासाठी (एलव्हीएम३) संगण, दिशादर्शन यंत्रणा, नियंत्रण इलेक्ट्रॉनिक, टेलिमेट्री आणि ऊर्जा प्रणाली यासारख्या घटकांचा पुरवठा केला. त्याशिवाय विद्युत व इलेक्ट्रॉनिक यंत्रणांशी संबंधित अनेक उपकरणांचा पुरवठा केला. ओम्नीप्रेझेंट रोबोटिक टेक्नॉलॉजिज लि. यांनी प्रज्ञान रोव्हरवरील प्रोसेसिंग इमेजसाठी वापरलेले सॉफ्टवेअर तयार केले. सेमीकंडक्टर लॅबोरेटरीज (एससीएल) या कंपनीने एलव्हीएम३ साठी विक्रम प्रोसेसर (१६०१ पीई०१) आणि सीएमओएस कॅमेरा कॉन्फिग्युरेटर (एससी१२१६-०) तयार केले.
हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कंपनीने रोव्हर आणि लँडरसाठी धातू आणि संयुगांच्या रचना, सर्व प्रोपेलंट टाक्या आणि बस रचना तयार करण्यात योगदान दिले. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने (बीएचईएल) लँडर मोडय़ूल आणि प्रोपल्शन मोडय़ूलसाठी लिथियम आयन बॅटरी आणि टिटॅनियम अलॉय प्रोपेलंट टाकी तयार केली. एमटीएआर टेक्नॉलॉजिजने एलव्हीएम३ साठी विकास इंजिने, टबरे पम्प, बूस्टर पम्प, वायू जनरेटर आणि इंजेक्टर गेड व इलेक्ट्रो-न्युमॅटिक मोडय़ूल यांच्यासह क्रायोजेनिक इंजिन उपयंत्रणांचा पुरवठा केला.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून जागतिक नेत्यांचे आभार
जोहान्सबर्ग : चंद्रयान-३ मोहिमेच्या यशाबद्दल जगभरातून भारतावर अभिनंदनाचा वर्षांव होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याबद्दल या नेत्यांचे आभार मानले. विज्ञानामुळे चंद्रावरील कठीण प्रदेशावर पोहोचणे भारताला शक्य झाले आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. जगभरात याकडे केवळ एका देशाचे यश म्हणून पाहिले जात नाही तर संपूर्ण मानवजातीचे यश म्हणून पाहिले जात आहे. ही आम्हा सर्वासाठी अभिमानाची बाब आहे. संपूर्ण जगाच्या वतीने भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्याची ही संधी आहे असे उद्गार त्यांनी काढले.
शास्त्रज्ञांचे कमी वेतनात काम – माधवन नायर
चंद्रयान-३ मोहिमेला मिळालेल्या यशामुळे इस्रोचे माजी प्रमुख जी माधवन नायर यांनी आनंद व्यक्त करतानाच, इस्रोच्या शास्त्रज्ञांना कमी वेतनावर काम करावे लागत असल्याचे लक्षात आणून दिले आहे. विकसित देशांच्या तुलनेत एक पंचमांश वेतन घेऊन भारतीय शास्त्रज्ञांनी हे ऐतिहासिक यश मिळवले आहे अशी प्रतिक्रिया नायर यांनी व्यक्त केली.
भारत कमी खर्चात अवकाश संशोधन करत असल्याचे एक कारण, इस्रोच्या शास्त्रज्ञांना कमी वेतन मिळणे हे आहे असे नायर म्हणाले. शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन जागतिक पातळीवर दिल्या जाणाऱ्या वेतनाच्या एक पंचमांश आहे असे त्यांनी सांगितले. इस्रोच्या शास्त्रज्ञांमध्ये कोणीही लखपती नाहीत आणि ते सर्वजण अतिशय सामान्य आणि नरमाईने जीवन जगतात असे ते म्हणाले. त्यांना पैशांची फिकीर नाही तर ते त्यांच्या कामाने झपाटलेले असतात आणि मोहिमेप्रति समर्पित असतात. त्यामुळेच आपण इतके उत्तुंग यश मिळवले आहे असे नायर म्हणाले. काळजीपूर्वक नियोजन आणि दीर्घकालीन दृष्टिकोन यांच्याद्वारे इस्रोच्या शास्त्रज्ञांना हे यश मिळाले आहे असेही त्यांनी सांगितले.
सोनिया गांधींकडून अभिनंदन
नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ‘इस्रो’चे प्रमुख एस सोमनाथ यांना पत्र लिहून चंद्रयान-३ मोहिमेबद्दल अभिनंदन केले. त्यांनी या पत्रात लिहिले आहे की, ‘अनेक दशकांच्या प्रयत्नांनी इस्रोच्या अतुलनीय क्षमता विकसित झाल्या आहेत आणि साठच्या दशकापासून स्वयंपूर्ण राहिल्यामुळे मोठे यश मिळाले आहे. इस्रोचे यश हा सर्व भारतीयांसाठी, विशेषत: तरुण पिढीसाठी अतिशय अभिमानाची आणि रोमांचक बाब आहे. इस्रोच्या सर्व सदस्यांना माझ्या शुभेच्छा! ’’.